
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – स्नेहालय संचलित उडान प्रकल्पामार्फत “माझं गाव बालविवाहमुक्त गाव” उपक्रमाच्या अनुषंगाने येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यासाठी जिल्ह्यातील १३४१ ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.शासनाने १४ जून २०१४ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करून बालहक्क रक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि बालमजुरी निर्मूलनासाठी या समित्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.बालविवाह रोखण्यात यशस्वी ठरलेल्या मुलींनी स्वतः पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना हे पत्र पाठवले असून गावांना बालविवाहमुक्त करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून स्नेहालय उडान प्रकल्प या उपक्रमाद्वारे सतत पत्रव्यवहार, जनजागृती मोहिमा आणि मुलींच्या सक्रिय सहभागातून बालविवाहमुक्त गावांचे अभियान राबवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व ग्रामपंचायतींना तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसभेत हा ठराव घेण्यासाठी परिपत्रक काढले आहे.
येत्या १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत “माझं गाव बालविवाहमुक्त गाव” ठराव पारित होणार असून, त्याद्वारे २०२७ पर्यंत संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.जिल्हा परिषद अहिल्यानगर, महिला व बाल विकास अधिकारी अहिल्यानगर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन तसेच स्नेहालय संचलित उडान प्रकल्प यांच्या संयुक्त उपक्रमामुळे जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले गेले आहे.
या संपूर्ण अभियानामध्ये स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मानसंचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उडानचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, सीमा जुनी, निशा वाघ, विनायक महाले, पत्रकार प्रवीण दरंदले, शुभम डहारे, पूजा डाकुआ यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
1. बालविवाह प्रतिबंध:
गावातील १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचा बालविवाह होणार नाही, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठोस कृती आराखडा तयार करणे.
2. लग्नसमारंभातील जबाबदारी:
बालविवाह प्रतिबंधासाठी ग्रामपंचायत हद्दीतील विवाहसोहळे आयोजित करणारे व्यवसायिक घटक (मंगलकार्यालय मालक, मंडप वाले, बँड पथक व डीजे, आचारी, डेकोरेशन करणारे आणि विवाहाशी संबंधित सर्व घटक) यांच्यात जनजागृती करून, वधू-वर अल्पवयीन नसल्याची खात्री पटवून घेण्यासाठी सूचना करणे.
3. गावपातळीवरील जनजागृती:
बालविवाह प्रतिबंध आणि बालहक्कांबाबत युवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गट, शाळा इत्यादींच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करणे.
4. कायद्याची अंमलबजावणी:
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे.
5. समित्या स्थापन करणे:
बाल संरक्षण समिती: शासन अधिसूचना दिनांक १० जून २०१४ नुसार गावात बाल संरक्षण समिती स्थापन करणे.
सखी सावित्री समिती: शासन अधिसूचना दिनांक १० मार्च २०२२ नुसार ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणे.
या दोन्ही समित्यांच्या माध्यमातून गावात बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना करणे, जोखीमग्रस्त आणि शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालविवाह पीडित मुलींचे पुनर्वसन करणे आणि सातत्याने जनजागृती राबविणे.
6. बालविवाहमुक्त गाव अभियान:
“माझं गाव – बालविवाहमुक्त गाव” अभियान गावात राबवून १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत गाव बालविवाहमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेईल.




