
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर — रात्र गडद होत चाललेली… रस्ते निर्मनुष्य… दुकाने बंद… आणि शहर झोपेच्या अधीन. पण अशा अंधारातही काही डोळे उघडे होते संकटात असलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी, त्यांची हाक ऐकण्यासाठी आणि त्यांना सुरक्षिततेकडे नेण्यासाठी. ही जागरूकता, ही संवेदना होती ‘स्नेहालय संचालित मुक्तीवाहिनी’ प्रकल्पाची.

बुधवारी, 30 जुलै रोजी रात्री 7 ते 12.30 वाजेपर्यंत या प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर शहरात बालकांच्या हक्कांसाठी विशेष रात्रगस्त राबवण्यात आली. रेल्वे स्टेशन, माळीवाडा बसस्थानक, स्वस्तिक चौक आणि तारकपूर बसस्थानक अशा मुख्य ठिकाणी ही रात्रगस्त पार पडली, जिथे रात्रीच्या वेळी अनेक बालक अपघाताने वा परिस्थितीमुळे संकटात सापडण्याची शक्यता असते.
या मोहिमेद्वारे सुमारे ५०० नागरिकांपर्यंत मुक्तीवाहिनी प्रकल्पाची माहिती पोहोचवण्यात आली, ज्यामध्ये रिक्षाचालक, दुकानदार, प्रवासी, बस कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि सामान्य नागरिक यांचा समावेश होता.सर्व स्वयंसेवकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन समाजातील विविध घटकांशी संवाद साधत ‘मुक्तीवाहिनी’चा उद्देश आणि महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले.

या रात्रगस्त मोहिमेदरम्यान स्थानिक स्वयंसेवकांशीही प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना संपूर्ण टीमची ओळख करून देण्यात आली.रेल्वे स्टेशन येथे आरपीएफ निरीक्षक विकेष तीमांडे, पोलीस हवालदार पठाडे आणि माळी यांनी मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याचे आश्वासन दिले. इतर ठिकाणीही नागरिकांनी या उपक्रमाबाबत कौतुक व्यक्त केले.

ही संपूर्ण रात्रगस्त मोहीम स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, संचालक हनिफ शेख आणि प्रविण कदम (उडान प्रकल्प व्यवस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. मोहिमेत शाहिद शेख,संगीता सानप, स्वप्नील मोकळ,सीमा जुनी, पूजा दहातोंडे,पत्रकार प्रवीण दरंदले, शुभम डहारे, निशा वाघ, पूजा डाकूआ, विनायक महाले, यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

‘मुक्तीवाहिनी’ ही स्नेहालय संस्था संचालित २४x७ कार्यरत सेवा असून, ती संकटग्रस्त बालकांसाठी तत्काळ वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, सुरक्षित निवारा आणि पुनर्वसन सेवा पुरवते.नगर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर एखादा बालक बेवारस, घाबरलेला वा संकटात सापडलेला आढळला, तर 9011098008 / 9011026495 या मुक्तीवाहिनी हेल्पलाइन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.कारण, एक फोनकॉल एखाद्या निरागस बालकाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.




