
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – राहुल राजळे
सोनई – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. या काळात चंद्रभागा नदीकिनारा व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. वारकरी गावी परतल्यानंतर या पवित्र भूमीचे सौंदर्य टिकवण्यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनईच्या वतीने “वारी स्वच्छतेची, वारी भक्तीची” हा उपक्रम 8 जुलै रोजी राबविण्यात आला.

माजी मंत्री शंकरराव गडाख व खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील 200 स्वयंसेवकांनी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. शेकडो किलो प्लास्टिक, निर्माल्य संकलन करून चंद्रभागा नदीकाठ व परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तरुणांनी समाजाप्रती जबाबदारीची जाणीव दाखवली. “स्वच्छतेतून भक्ती” हा संदेश देत यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने एक वेगळा आदर्श निर्माण केला. उपक्रमातून तरुणांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजावेत हा यामागील उद्देश होता, असे गडाख यांनी यावेळी सांगितले.उदयन गडाख यांनी पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात स्वच्छता वारी राबविण्याचे जाहीर केले असून, अधिकाधिक युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांकडून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचे भरभरून कौतुक करण्यात आले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या 200 स्वयंसेवकांनी 3 ट्रॅव्हल्समधून सोनई (ता. नेवासा) येथून पंढरपूर गाठले आणि स्वच्छता वारी राबविल्याबद्दल त्यांचे वारकऱ्यांनी कौतुक केले.




