
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पाथरे – राहता तालुक्यातील पाथरे बु येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यालयस्तरीय विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात आणि लोकशाही पारदर्शकतेने पार पडली. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांनी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) चा वापर करत खऱ्या मतदान प्रक्रिया कशी पार पडते याचा सजीव अनुभव घेतला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्ये आत्मसात केली. निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया शाळेत उभी करण्यात आली होती त्यामध्ये उमेदवारांची निवड, अर्ज भरणे, प्रचार मोहीम, घोषणाबाजी, मते मागणे, अशा सगळ्या टप्प्यांचा समावेश होता. प्रचाराच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रचारफेऱ्या, बॅनर, पोस्टर, नारे, यांचा वापर करून वातावरण उत्साही केले होते.मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून, शाई लावून, ईव्हीएम मशीनवर बटण दाबून मतदान केले. मतदान केल्यानंतर येणारा ‘बीप’ आवाज हे अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद व उत्सुकता दिसून येत होती. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी केवळ निवडणूक नसून लोकशाहीचा एक जिवंत पाठ ठरला.
निवडणुकीचे संपूर्ण व्यवस्थापन शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केले होते. मतदान केंद्र, मतदान यादी, मतमोजणी, आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सर्व अगदी खऱ्याखुऱ्या निवडणूक प्रक्रिये सारखीच हाताळली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आणि त्यांचा सत्कार व पदग्रहण व शपथ सोहळा देखील पार पडला. हर्षल कदम हा विद्यार्थी मुख्यमंत्री तर दिक्षा कडू उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत.
मुख्याध्यापक श्री.बारगुजे सर यांनी सांगितले, की “विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून मिळावे, हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. भविष्यात जबाबदार नागरिक आणि सजग मतदार घडविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात.” यावेळी मुख्याध्यापक श्री बारगुजे, उपमुख्याध्यापिका सौ वाणी, पर्यवेक्षक श्री.तांबे तसेच शिक्षकवृंद, पालक, आणि ग्रामस्थ यांची देखील उत्स्फूर्त उपस्थिती लाभल्याने या उपक्रमास अधिक बळ मिळाले. विद्यार्थ्यांनी मिळवलेला हा अनुभव त्यांच्या विचारविश्वाला व्यापक आणि जागरूक बनवणारा ठरला.




