
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स फार्मासिटिकल्स तारापूर मुंबई या नामांकित कंपनीत एम एस्सी केमिस्ट्री विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली असून या बहुराष्ट्रीय कंपनीने ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगले वार्षिक पॅकेज दिले आहे अशी माहिती संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण हे दिले जाते. संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून विविध कंपन्यांबरोबर करारही करण्यात आले आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र,प्रक्षेत्र भेटी त्याचबरोबर विविध कौशल्य देऊन या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांसाठी सक्षम केले जाते आणि या माध्यमातून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील सर्वच विभागाचे विद्यार्थी हे प्लेसमेंट मध्ये अव्वल स्थानावर असल्याचे महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ आर. ए. पवार यांनी सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डाॅ.प्लदिप दिघे, कॅम्पस संचालक डाॅ. आर. ए.पवार, उपप्राचार्य डॉ. शांताराम चौधरी, डॉ. अनिल वाबळे, डॉ. छाया गलांडे, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डाॅ. मनोज परजणे,डाॅ. हरिभाऊ दुबे आणि आप्पासाहेब शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले.
या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे ,डाॅ.आर.ए.पवार यांचे सह संस्थेतील सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
