
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव येथे दिनांक १६ जून रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात आनंदमय वातावरण होते. नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट व मोजे यांचे मोफत वाटप करण्यात आले. वही, पेन यांसारख्या वस्तू मान्यवरांकडून भेट स्वरूपात देण्यात आल्या. पंचक्रोशीत प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात येवून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. शाळेतील प्रवेशोत्सव फलकाचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब चौधरी होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. गोरक्षनाथ चौधरी, उपाध्यक्ष शाम चौधरी, माजी अध्यक्ष बाबासाहेब चौधरी, तसेच महेंद्र चौधरी, विजय चौधरी, निलेश चौधरी व अनिल पोटे यांची उपस्थिती होती. गावातील अनेक ग्रामस्थ आणि माता-पिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनात व्हेज पुलाव आणि गोड पदार्थ म्हणून जिलेबीचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका संगीता अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका मेघा बागुल, शिक्षक मारुती खरात व संतोष हेकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समितीचे विशेष तज्ञ दत्ता क्षीरसागर व कुंभार्डे सर यांनी शाळेला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह संचारला.
जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शतकपूर्तीचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. आजवर या शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले असून यावर्षी पहिलीत झालेल्या भरघोस प्रवेशामुळे शाळेवरील पालकांचा आणि ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आत्मीयता निर्माण होत असून संपूर्ण परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
