
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
जळगाव – वाढदिवस म्हणजे केक, पार्टी आणि खर्च अशी सर्वसामान्य कल्पना असते. मात्र जळगावातील युवक निखिल चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत एक वेगळा आदर्श घालून दिला. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, चॉकलेट व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर आदी शालेय साहित्य वाटण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनसोबत केक कापून वाढदिवस साजरा झाला खाऊ वाटण्यात आला. यावेळी लहानग्या विद्यार्थ्यांनी निखिल चौधरी यांना वाढदिवसाच्या उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या समारोपात शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता आहिरे मॅडम यांनी निखिल चौधरी यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाला उपशिक्षिका मेघा बागुल, उपशिक्षक संतोष हेकरे, मारुती खरात यांच्यासह केतन वाणी, जयदीप चव्हाण, पंकज चौधरी, अनिकेत चौधरी हे युवकही उपस्थित होते.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. गोरक्षनाथ चौधरी, उपाध्यक्ष शाम चौधरी, माजी अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माता-पालक वर्गाने उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
गावातील युवकांनी याच गोष्टीचा आदर्श घेवून पुढे आपला वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांसोबत सामाजिक जाणिवेतून साजरा करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
