
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो; पण गेल्या काही वर्षांत पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव आणि त्यांच्यासमोर उभे राहिलेले अस्तित्वाचे प्रश्न यामुळे पत्रकारिता धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्य मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे साहेबांनी जाहीर केलेली प्रशांत टेके पाटील यांची पदनियुक्ती महत्वपूर्ण असुन निश्चितच स्वागतार्ह आहे.
कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र व ज्येष्ठ पत्रकार पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्रशांत रावसाहेब टेके पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ही निवड केवळ सन्मानाची बाब नाही, तर पत्रकारांच्या हक्क, न्याय व सुरक्षेसाठी नवे नेतृत्व उभे राहिल्याचा दिलासा आहे.
नुतन प्रदेश संपर्कप्रमुख प्रशांत टेके पाटील यांनी आपल्या निवडीनंतर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडताना सांगितले,पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, आरोग्य सुविधा, जीवन सुरक्षा कवच, निवास, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पत्रकारांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यावर ठोस तोडगा काढेपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे.”
ही भूमिका नुसती घोषणाबाजी नसून, दीर्घकाळ पत्रकारांसाठी लढणाऱ्या नेत्याच्या तळमळीचे प्रतीक आहे. आज पत्रकारितेला केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, तर जिवंत राहण्यासाठी संरक्षण हवे आहे. शासनाने वारंवार आश्वासने दिली, पण प्रत्यक्षात फारसे बदल झालेले नाहीत. अशा वेळी या पदावरून सातत्याने होणारा पाठपुरावा हा पत्रकारांच्या अस्तित्वासाठी आशेचा किरण आहे. पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने राज्य मराठी पत्रकार परिषदेमध्ये सामील होऊन सामुदायिक रीत्या न्याय हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे, असे आवाहन प्रशांत टेके पाटील यांनी केले आहे.
या निवडीमुळे परिषदेतील पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशांत टेके पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




