
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – कोपरगाव बस आगारात वर्कशॉप कार्यशाळेचे 12 कोटी रुपये खर्चाचे काम, तसेच चार कोटी रुपये खर्चाचे चार्जिंग टेशन चे काम प्रगतीपथावर आहे. जुन्या जागेतून नव्या कार्यशाळेच्या जागेत आगार प्रमुख केबिन सह कार्यालय लवकरच शिफ्ट केले जाणार आहे. कोपरगाव आगार सातत्याने नफा कमवण्यात क्रमांक एक वर असते. नव्या कामामुळे गेल्या 55 वर्षानंतर या आगारातील कार्यशाळेचा कायापालट होणार आहे. या नव्या वर्कशॉप कार्यशाळेचे काम कर्जत येथील प्रशांत फलके कॉन्ट्रॅक्टर यांनी घेतले आहे. कार्यशाळेत एकच वेळी बारा गाड्या दुरुस्त केल्या जाऊ शकतील अशी सुविधा केली आहे. त्या शेजारीच 24 गाळे बांधण्यात येत आहे. त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. आगार प्रमुख केबिनसह आगारातील सर्व कार्यालय रेस्ट रूम, पुरुष महिलांसाठी स्वतंत्र वॉश रूम, 60 यांत्रिकी कर्मचारी या कार्यशाळेत कार्यरत आहेत. ते आता प्रशस्त जागेत येणार आहेत. संपूर्ण कार्यशाळेचा परिसर काँक्रीट करण केला जाणार आहे. हे सर्व काम 14 महिन्यात केले जाणार होते, मात्र त्याचा थोडा कालावधी वाढणार आहे. स्टेशन रस्त्यावरील औद्योगिक वसाहती मधून असलेल्या वीज वितरण केंद्रा मधून नव्याने होत असलेल्या चार कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक पद्धतीचे चार्जिंग स्टेशन साठी स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे, त्याचे साहित्य येथे येऊन पडले आहे. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे प्रगती पथावर आहेत. नगर जिल्ह्यात सातत्याने नफा कमवण्यात क्रमांक एक नंबर वर असलेल्या कोपरगाव आगारात आठ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे.
आगाराची स्थिती.कोपरगाव आगारात 122 वाहक, 142 चालक, सुरक्षारक्षक 6, साफसफाई कामगार कंत्राटी चार, वर्कशॉप साठी 60 मेकॅनिक कर्मचारी, बस आगारातील व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचा स्टॉप 35 कर्मचारी, एकूण बस गाड्या 68, त्यात शिवशाही सात, स्लीपर कोच चार, नव्या बस गाड्या दहा, असून सर्व बस गाड्या पंधरा वर्षाच्या आतीलच आहेत. कोपरगाव आगारांतर्गत शिर्डी व राहता बस आगार येतात. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी मुळे कोपरगाव आगाराला मोठे महत्त्व आहे. येथील आगारातून दररोज 550 बस गाड्या फेऱ्या करतात. त्यातून हजारो प्रवासी सुरक्षितपणे ये जा करतात . चौकट. कोपरगाव बस आगाराला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रादेशिक स्तरावर कोपरगाव आगाराला अडीच लाखांचे, तर राहता आगाराला दीड लाखांच बक्षीस मिळाले आहे. चौकट. उत्पन्नाच्या बाबतीत कोपरगाव आगार क्रमांक एक वर कायम…. एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान दहा महिन्यात कोपरगाव आगाराला एक कोटी 82 लाख रुपये निवड नफा झाल्याची माहिती आगारप्रमुख अमोल बनकर यांनी दिली.
नगर जिल्ह्याला एकूण शंभर नवीन बस गाड्या मिळणार आहेत त्यापैकी कोपरगाव आगाराला 40 बस गाड्या मिळणार आहेत असे सांगितले जाते, मात्र इतर डेपोंना पाच, दहा, नव्या बस गाड्या मिळाल्या आहेत, मात्र कोपरगावला ते अद्याप मिळालेल्या नाही त्यामुळे नाराजीचा सूर आहे. आगाराची कामे प्रगतीपथावर… सध्या कोपरगाव आगारात नव्याने शॉपिंग सेंटरची उभारणी, मोठ्या वर्कशॉप ची उभारणी, तसेच इलेक्ट्रिकल बस साठी चार्जिंग स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे असे श्री बनकर यांनी सांगितले. सध्या सर्वत्र अतिक्रमण मोहीम सुरू असून कोपरगाव आगाराच्या दोन्ही प्रवेशद्वारावर मोठ-मोठे अतिक्रमणे झाली होती,ती नगरपालिकेच्या वतीने जमीन दोस्त केल्याने आता लांबून बस स्थानक दिसत आहे. बस स्थानकाच्या एका प्रवेशद्वारालगत पोलीस चौकी ही उभारण्यात आली आहे. बस आगारात रोजचे रोज स्वच्छता करण्यात येते, बस गाड्या आल्यावर आता दिलेल्या आदेशानंतर गाडी तपासून लॉक करण्यात येते असे आभार प्रमुख बनकर यांनी सांगितले. प्रवाशांच्या तक्रारी. मात्र अनेक बस गाड्यांना बस कुठून कुठे जात आहे याची पाटीच नसते, बस आगारात गाडी बाबत पुकारणी होत नाही, तसेच कंट्रोल कॅबिनमध्ये असलेला दूरध्वनी कायम बंद असतो किंवा तो फोन उचलत नाही, काही ठिकाणी बस गाड्यांना थांबे असूनही तेथे त्या थांबत नाहीत, हात दाखवा गाडी थांबवा याला चालक, वाहक प्रतिसाद देत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. बस स्थानकावर भिकारी व इतर लोकांचे रात्रीच्या वेळी साम्राज्य असते. तसेच आगारात येणाऱ्या बस फलटावर आल्यावर प्रचंड गुळ येथे व धुळीचे साम्राज्य सर्व स्थानकात पसरते ती सर्व प्रवाशांच्या अंगावर उडते त्यात सुधारणा करण्यात याव्या अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
