(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये साहसी ट्रेकिंगचा अनुभव घेत पायरेन्स डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तसेच प्रवरा नदीच्या उगमस्थळाला भेट देत जलसंवर्धनाचे महत्त्व जाणून घेतले. साहस, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
पायरेन्स संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे सचिव तथा संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना साठे यांच्या सहकार्याने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
रतनवाडी येथील ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याने निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचते. त्यामुळे पर्यटकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकावा, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
रतनगडाच्या डोंगरवाटांवरून मार्गक्रमण करताना विद्यार्थ्यांना शारीरिक सहनशक्ती, आत्मविश्वास, संयम आणि संघभावनेचा अनुभव मिळाला. सह्याद्रीतील वनस्पतीसृष्टी आणि जैवविविधतेचे निरीक्षण करताना निसर्ग व मानवी आरोग्य यांच्यातील परस्परसंबंधही समजून घेता आले. आयुर्वेदातील निसर्गपूरक जीवनशैली आणि नियमित शारीरिक हालचालींचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले.
विद्यार्थ्यांनी प्रवरा नदीच्या उगमस्थळाला भेट देऊन जलस्रोतांचे महत्त्व जाणून घेतले. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नदीचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि नैसर्गिक समतोल राखण्याची गरज याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
रतनगड किल्ला आणि अमृतेश्वर मंदिर या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबरोबरच निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. साहसी पर्यटनाला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देणारा पायरेन्स आयुर्वेदिक महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवांना चालना देणारा ठरला.