अहिल्यानगर जिल्हा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांवर केलेलं विधान हे वैफल्यग्रस्त भावनेतून; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर –“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबियांच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले विधान हे संपूर्णपणे वैफल्यग्रस्त भावनेतून आहे. सर्व स्तरांवर पक्षाला येत असलेल्या अपयशाची ही एक केविलवाणी कबुली असून, अत्यंत खालच्या स्तरावरील वक्तव्य करून त्यांनी राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले आहेत,” अशी खरमरीत टीका जलसंपदा तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

 

मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करून मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, राजकारणामध्ये काही सभ्यता आणि संकेत पाळायचे असतात, परंतु खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा पद्धतीचे अनुद्गार काढले जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. राजकीय विरोधाच्या नावाखाली इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणे ही कॉग्रेसने गाठलेली वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा आहे.

 

कॉग्रेस पक्षाला सर्वच स्तरांवर मोठे अपयश येत असून, देशातील जनतेने वेळोवेळी दिलेला पराभवाचा कौल त्यांना अजूनही पचविता आलेला नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी अनेक आंदोलने करून पाहिली, सीजेपीचाही आधारही घेऊन पाहिला; पण देशातील सुज्ञ जनता त्यांना प्रतिसाद द्यायला अजिबात तयार नाही. त्यामुळेच आता वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांची ही वादग्रस्त वक्तव्ये समोर येऊ लागली आहेत. देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांच्या कुटुंबियांबद्दल अपमानकारक भाषा देशातील सुजाण जनता कधीही सहन करणार नाही आणि राजकारणातील संकेत मोडणाऱ्या लोकांना जनता कधीही थारा देणार नाही, असा इशाराही मंत्री विखे पाटील यांनी दिला.

 

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ऊर्जा प्रकल्पाचा मूळ विषय नीट समजून न घेता त्यावर राजकीय भाष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट करत पालकमंत्री म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सर्व भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. तिथे सुरू होणाऱ्या आधुनिक ऊर्जा प्रकल्पामुळे राज्याचा विजेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होईल, अशी वस्तुस्थिती नाही. उलट, नियोजित क्षेत्रापेक्षा दुप्पट वृक्षारोपण करून निसर्गाचे संवर्धन अधिक प्रभावीपणे केले जाणार आहे.”

 

जिल्ह्यातील चारा टंचाईच्या उपाययोजनांबाबत माहिती देताना मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले आहे. चाऱ्याला जिल्हाबंदी केल्याने जर कुठे काही प्रश्न निर्माण होत असतील, तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून यावर तात्काळ सुवर्णमध्य काढला जाईल. सध्या कमी पाण्यात कमी जागेत पौष्टिक चारा उपलब्ध करून देणाऱ्या ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून चारा निर्मिती करण्यालाच प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा टंचाई निधीतून आवश्यक तो निधी वेळेत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!