अहिल्यानगर जिल्हा

दुष्काळामुळे सत्कार स्वीकारणार नाही, सत्काराऐवजी गरजूंना मदत करा; बिपीनदादा कोल्हे यांचे आवाहन

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीनंतर समर्थकांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर समर्थक कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी येऊ नये. सत्कार आणि पुष्पगुच्छांवर खर्च करण्याऐवजी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गोरगरीब, गरजू कुटुंबांना धान्य,पाणी उपलब्धता, पशुंधनाला चारा यासारखे मदतीचा हात द्यावा, असे संवेदनशील आवाहन बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.

 

सध्या दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. अशा संकटाच्या काळात वैयक्तिक अभिनंदनापेक्षा गरजूंच्या मदतीला प्राधान्य देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे, अशी भूमिका बिपीनदादा कोल्हे यांनी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयातून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि जनहिताला दिलेले प्राधान्य अधोरेखित होत आहे.

 

बिपीनदादा कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ आणि अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याची आदर्श परंपरा यापूर्वीही जपली आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करून आनंदाचे क्षण अधिक अर्थपूर्ण करण्याचा त्यांचा दृष्टिकोन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

 

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतरही त्यांनी सत्काराऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे केलेले आवाहन त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतीक मानले जात आहे. सत्कारातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा संकटात सापडलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश त्यांच्या भूमिकेतून अधोरेखित होत असून, कार्यकर्त्यांनीही सामाजिक सेवेचा हाच आदर्श पुढे न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!