(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव जाहीर केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी पत्रकाद्वारे कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे. सोमेश्वर कारखान्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडावी. जो कारखाना प्रतिटन किमान चार हजार रुपये भाव जाहीर करेल, त्या कारखान्याचा शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने प्रथम नागरी सत्कार करण्यात येईल, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.
यंदा प्रचंड दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात सुमारे ५० टक्के घट झाली आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चात चारपट वाढ झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेले पीककर्ज फेडणेही कठीण होणार असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा आणि साखरेचा दर प्रतिकिलो ५५ रुपये ठरवल्याशिवाय साखर विक्री करू नये, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
या मागण्या मान्य करून घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणणे शक्य आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये मंत्री आणि अनेक आमदारांचा समावेश असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे ठाम भूमिका मांडावी, असे मत शेळके यांनी व्यक्त केले. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे लोकप्रतिनिधी आणि कारखानदार पुढाकार का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ऊसापासून साखरेबरोबरच इथेनॉलसह विविध उपपदार्थांची निर्मिती करणारे कारखाने अहिल्यानगर जिल्ह्यात असतानाही ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा आदर्श का घेत नाहीत, असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान प्रतिटन चार हजार रुपये भाव जाहीर करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाचा शेतकरी संघटनेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येईल, असे शेळके यांनी पत्रकाच्या शेवटी स्पष्ट केले.