(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – भारतामध्ये अलीकडील काळात अन्न प्रक्रिया उद्योगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्न तंत्रज्ञान विषयातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता अन्न तंत्रज्ञान पदवीधरांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेअंतर्गत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, खडकेवाके येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पायरेन्स संस्थेचे संचालक तथा सचिव डॉ. निलेश बनकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. स्वरांजली गाढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. काजल खंडागळे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी निळे, कृषी तंत्रज्ञान विद्यालयाचे प्राचार्य प्रा. सूरज जोंधळे, विद्यार्थी प्रतिनिधी शाम खरात आणि भावना जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. निलेश बनकर यांनीही विद्यार्थ्यांना अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगातील रोजगार, उद्योजकता आणि भविष्यातील करिअरच्या संधींची माहिती देण्यात आली.