(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचवीस वर्षांची कारकीर्द संकल्प, संघर्ष आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित झालेली आहे. विश्वमान्य नेतृत्व म्हणून जगात त्यांचा गौरव होत आहे. विकसित भारताची वाटचाल साध्य करताना विरासत आणि विकास यांचा योग्य समन्वय त्यांनी साधला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वाटचालीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्याचे प्रभारी लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आ. अक्षय कर्डीले, आ. विवेक कोल्हे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सभेनंतर शहरातून सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून महाविशाल गणपती मंदिरात पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, २५ वर्षांचा हा प्रवास एका व्यक्तीच्या राजकीय कारकीर्दीचा नाही, तर संकल्प, संघर्ष, संघटन, विकास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा आहे. संघाच्या स्वयंसेवकापासून सुरू झालेला प्रवास देशाच्या पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला. प्रत्येक पदाच्या जबाबदारीत पंतप्रधान मोदी यांनी प्रशासन, विकास आणि जनसहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आदर्श निर्माण केला.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अनेक अर्थांनी बदलत्या भारताचा प्रवास आपण पाहत आहोत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र देशाच्या केंद्रस्थानी ठेवून गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक आणि समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रत्येक निर्णयातून झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जनधन योजनेपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत आणि घरकुल योजनेपासून आयुष्मान भारत योजनेपर्यंत विविध योजनांचा लाभ समाजातील छोट्या घटकांना देऊन अंत्योदयाचा मंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरवला गेला आहे. त्यामुळे सामान्य माणूस देशाच्या विकास प्रक्रियेशी जोडला गेला आहे. पंचवीस वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीत भारताची डिजिटल वाटचाल, मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा आणि व्यवहार सामान्य माणसाच्या हातात आले आहेत. यूपीआय ही भारताच्या डिजिटल क्षमतेची जगभरात चर्चिली जाणारी ओळख बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून भारताला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न मोदी यांच्या नेतृत्वात झाला. त्यामुळे स्टार्टअप संस्कृती, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताची स्वतंत्र ओळख जगामध्ये निर्माण झाली असल्याचा अभिमान मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांमधून नव्या संधी उपलब्ध होत आहेत. युवकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी ‘स्किल इंडिया’, तसेच ‘नारीशक्ती’ ही केवळ घोषणा न राहता विकासाची शक्ती बनली पाहिजे, हा विचार पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने अधिक ठळक झाला आहे. बदलता भारत आणि भारताची जगातील बदलती प्रतिमा मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी झाल्याचा अभिमान प्रत्येक देशवासीयांच्या मनामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी, तीन तलाकाच्या कायद्यातून मुस्लिम महिलांची सुटका किंवा ज्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान झाले ते कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय, हा विकसित भारताचा एक नवा अध्याय या वाटचालीतून निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.