(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांचा कल कृषी आधारित उद्योगांकडे व्यवसायाच्या दृष्टीने वाढत आहे. त्यामुळे कृषी पदवीधारक तरुणांसाठी कृषी आधारित उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन कृषीभूषण बन्सी तांबे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि कृषी संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांबे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके होते. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध कृषी आधारित उद्योग उभारणी, व्यवसायाच्या संधी तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींबाबत कृषीभूषण बन्सी तांबे यांच्याशी संवाद साधत विविध शंका विचारल्या. तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समर्पक व अचूक निरसन करून त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश जाधव यांनी केले