अहिल्यानगर जिल्हा

गोंडेगावच्या जिल्हा परिषद शाळेने स्वप्नांची उंची मोठी ठेवली – आ. विवेक भैय्या कोल्हे

गोंडेगाव येथे गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव; आ. कोल्हे आ.ओगले यांच्याकडून शाळेसाठी विविध सुविधांची घोषणा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – गोंडेगावची पीएम श्री जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा आहे, हे आपण निश्चित मान्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक अतोनात प्रयत्न करत आहेत. आदर्श शिक्षक केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला घडवत असतो. शाळेची इमारत जरी लहान असली तरी स्वप्नांची उंची मोठी ठेवायला हवी आणि तीच स्वप्नांची उंची गोंडेगाव शाळेने ठेवलेली दिसून येत आहे, असे गौरवोद्गार आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी काढले.श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक गुणगौरव समारंभाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार विवेक भैय्या कोल्हे व आमदार हेमंत ओगले उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी तसेच आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार विवेक भैय्या कोल्हे म्हणाले, “मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, आमचे सहकारी मित्र आमदार हेमंतजी ओगले हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. वास्तविक पाहता आम्ही एकमेकांनी भांडण केले पाहिजे. परंतु शाळेच्या ठिकाणी आपले राजकीय किंवा पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सहभागी झाले पाहिजे. तसे आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, ते आमचे मित्र आहेत.” त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी हशा पिकला.हा एक चांगला कार्यक्रम आहे. ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिले पाहिजे. यासाठी आम्ही दोघेही आमदार या नात्याने या कार्यक्रमात उपस्थित राहिलो आहोत,” असेही कोल्हे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळेला खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी शब्द दिला.

यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी गोंडेगाव शाळेचे कौतुक केले. “गोंडेगावची शाळा उत्तम असून शाळेच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे नाव जिल्हा, राज्य व देशामध्ये जात आहे. शेवटी कुठेतरी एक आदर्श ठेवावा लागतो. हा आदर्श गोंडेगाव शाळेच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवला जात आहे,” असे ते म्हणाले. यावेळी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

शाळेच्या विकासासाठी आमदार हेमंत ओगले यांनी आमदार निधीतून शाळेच्या शेडसाठी पाच लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच खेळाचे साहित्य घेण्यासाठी एक लाख रुपये देण्याचे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड व कॉम्प्युटर बोर्ड उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिनजी गुजर होते. यावेळी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, सुधाकरनाना ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, श्री गणेश कारखान्याचे संचालक अरविंद फोपसे, श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रिती घोरपडे, गटशिक्षण अधिकारी दीपक त्रिभुवन, भरतजी बढे, गोंडेगावचे सरपंच सागरजी बढे यांच्यासह मुख्याध्यापिका वैशाली मॅडम, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!