अहिल्यानगर जिल्हामहाराष्ट्र

‘सारथी’ संस्थेला १२२ कोटी, तर अण्णासाहेब पाटील महामंडळास १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर- डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिक्षण आणि व्यवसायासाठी भरीव मदत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून १२२ कोटी ३४ लाख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला गती मिळणार आहे,” तसेच शिक्षण आणि व्यवसायासाठी भरीव मदत करण्यात आली आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खूप मोठा लाभ विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे.

 

उपसमीतीचे अध्यक्ष विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने ‘सारथी’ संस्थेला नेहमीच भरीव निधी दिला आहे. याच अनुषंगाने संस्थेच्या भव्य वसतिगृहांच्या बांधकामासाठी १२२ कोटी ३४ लाख ६० हजार रुपयांच्या निधी मंजुरीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

 

राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनी अशा एकूण १,००० विद्यार्थी क्षमतेच्या आठ भव्य विभागीय वसतिगृहांच्या उभारणीचे काम आता पूर्णत्वास जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही सर्व वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष सेवेत उपलब्ध होतील, अशा दृष्टीने जलदगतीने नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबाबत माहिती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महामंडळासाठी तब्बल ७५० कोटी रुपयांची भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी महामंडळाला ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता नव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महामंडळास आणखी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील मराठा समाजातील तरुणांच्या व्यावसायिक स्वप्नांना आणि नवउद्योजकांना मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!