
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर : नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कारवाई करत ९२ लाख ९ हजार ५०० रुपये दर्शनी किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, या प्रकरणी बारामती येथील तिघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गणेश दिलीप शेवाळे याच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट भारतीय चलनी नोटा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव रोडवरील विनायक कॉलनी येथे छापा टाकला. घराची झडती घेतली असता जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीमध्ये बनावट नोटांचा मोठा साठा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागदांचे बंडल आढळून आले.
या कारवाईत गणेश दिलीप शेवाळे (वय ३३), सुमित विकास चंदनशिवे (वय २५) आणि सुरज वसंत कांबळे (वय २७) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १८ हजार ४१९ बनावट नोटा, पाच मोबाईल फोन आणि फोक्सवॅगन कार असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असे आमिष दाखवून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. या बनावट नोटा मालेगाव येथील एका व्यक्तीकडून २५ हजार रुपयांना घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे, तसेच या बनावट नोटांचा वापर कुठे आणि कोणाकडून करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, प्रताप धुमाळ, अशोक भिमराज दारकुंडे आणि ‘अम्मू’ हे संशयित फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



