
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वज अवतरण सोहळा उद्या, सोमवार (२८ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ध्वज अवतरण करण्यात येणार आहे.
सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह १८ ते २५ ऑगस्टदरम्यान श्री क्षेत्र धनगरवाडी येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. सप्ताहाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धनगरवाडी तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला.
सप्ताहाची सांगता झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ध्वज अवतरण सोहळ्यावेळी जमा खर्च व श्रमपरिहार कार्यक्रमही होणार आहे. सप्ताहाच्या आयोजनासाठी परिश्रम घेणारे ग्रामस्थ, भाविक, सेवेकरी तसेच सप्ताह समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समिती, समस्त ग्रामस्थ धनगरवाडी व पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे. धनगरवाडी व पंचक्रोशीतील भाविकांनी उद्या सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र धनगरवाडी येथे उपस्थित राहून ध्वज अवतरण सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




