महाराष्ट्रशैक्षणिक

समाजाचा विचार करणारे कर्मवीर भाऊराव पाटील – प्रशांत खामकर

चितळीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १३९वा कर्मवीर जयंती सोहळा;दोन वर्गखोल्यांसाठी मदतीचा हात; जेष्ठ नेते गंगाधर चौधरी ५१ हजार, शंकर नाना चौधरी ११ हजार, पंडितराव वाघ यांच्याकडून ५ हजारांची मदत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी : समाजाचा विचार करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अंधश्रद्धेला थारा न देता वंचित, दुर्लक्षित आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्यामुळे समाजातील सर्वसामान्य घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रशांत जालिंदर खामकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चितळी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३९वा जयंती सोहळा तसेच दोन वर्गखोल्यांच्या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागाने झांज, लेझीम वाद्यासह गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर भिवाजी चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संजय सोन्याबापू वाघ, प्रमोदजी तोरणे तसेच रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग, अहिल्यानगरचे सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दोन वर्गखोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील इयत्ता बारावी व दहावीतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह इयत्ता सातवीतील शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवीतील एनएमएमएस परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रमोदजी तोरणे यांनी रयत शिक्षण संस्था गुणवत्तेला महत्त्व देते. संस्थेतील सेवक व विद्यार्थ्यांनी संस्थेवर नितांत प्रेम करून संस्थेचे ऋण व्यक्त करावे, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात प्राचार्य एन. एन. शिरसाट यांनी विद्यालय प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. सन १९८७-८८च्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या किचन शेडचे नूतनीकरण करून दिल्याबद्दल त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. संजय सोन्याबापू वाघ यांनी या विद्यालयात शिक्षण घेतल्याचा अभिमान व्यक्त करत शिक्षणाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही, असे सांगितले.

दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी विद्यालयातील सेवकांनी एक दिवसाचा पगार मदत म्हणून दिला. संजय सोन्याबापू वाघ यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ एका वर्गखोलीच्या बांधकामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर चौधरी यांनी ५१ हजार रुपये, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शंकर नाना चौधरी यांनी ११ हजार रुपये, तर ग्रामस्थ पंडितराव वाघ यांनी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. विद्यालयाच्या वतीने सर्व मदतदारांचे आभार व्यक्त करण्यात आले. गंगाधर चौधरी यांनी विद्यालयाच्या विकासासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले.

यावेळी विद्यालयातील सेवक वर्गाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच चितळी ग्रामस्थ उपस्थित होते. पर्यवेक्षिका ए. एस. सातव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अध्यक्षीय सूचना जी. एम. कुंदे यांनी केली, तर अनुमोदन आर. एस. हिवाळे यांनी दिले. सूत्रसंचालन ए. एल. झुराळे यांनी केले. आभार आर. एस. हिवाळे यांनी मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!