प्रशासकीयमहाराष्ट्र

चितळी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; वाकडी शिवारात एकाच रात्रीत १० ते १५ शेतकऱ्यांच्या केबली लंपास

चोरट्यांकडुन श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीला आव्हान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील वाकडी शिवारातील जाधव-पानसरे वस्ती तसेच बरड वस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या विहिरींमधील मोटारींना जोडलेल्या विद्युत केबली लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात सुमारे १० ते १५ शेतकरी बाधित झाले असून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

स्थानिक शेतकरी सागर जाधव हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटार सुरू होत नसल्याने त्यांनी पाहणी केली असता विहिरीतील मोटारीला जोडलेली केबल विहिरीच्या कडेजवळून कापून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेतकरी आबासाहेब जाधव, इंदरभान पानसरे, दिनकर भवार, सचिन पानसरे, संजय भवार, सुरेश जाधव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबली चोरीला गेल्याचे समोर आले.

 

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुमारे १० ते १५ शेतकरी बाधित झाले असून त्यांच्या शेतातील मोटारींना जोडलेल्या विद्युत केबली चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या चोरीत हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. आधीच वाढत्या शेतीखर्चाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता सिंचन व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, परिसरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांवर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

 

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी चितळी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील पांढरी वस्ती शिवारातही अशाच प्रकारे मोटार केबली चोरीची घटना घडली होती. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चितळी पोलीस दूरक्षेत्र पूर्णवेळ खुले राहत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच मागील वर्षभरात जळगाव परिसरात शेतातील पाईप सेट, स्प्रिंकलर संच, विद्युत मोटारी आणि केबली चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून चोरीच्या प्रकारांना अद्यापही प्रभावीपणे आळा बसलेला नाही. त्यामुळे वाकडी शिवारातील ताज्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे.

 

चितळी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरटे वारंवार हात साफ करत असून काही घटना पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाकडी, चितळी आणि जळगाव परिसरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरटे निर्धास्तपणे शेतशिवारात शिरून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास करत असताना त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, एका बाजूला पोलिसांची रात्रगस्त सुरू असल्याचे सांगितले जाते, तर दुसऱ्या बाजूला चोरटे एकाच रात्रीत अनेक शेतकऱ्यांना लक्ष्य करतात. त्यामुळे चितळी पोलीस दूरक्षेत्र आणि श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या चोरीच्या सत्राला आळा कधी बसणार, तसेच चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक आणि शेतकरी उपस्थित करत आहेत.वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!