कृषीप्रशासकीयमहाराष्ट्र

जळगावात शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन;श्री महादेव शेतकरी गटाचा सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत यशस्वी सहभाग 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

जळगाव -राहाता तालुक्यातील जळगाव येथे कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ‘श्री महादेव शेतकरी गटा’ने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने गटातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना गट शेती आणि सेंद्रिय शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यशाळेत सहाय्यक कृषि अधिकारी तथा पाणी फाउंडेशनचे मेंटॉर राजेश पऱ्हे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी गटाचे महत्त्व विशद करतानाच ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेचे निकष, गुणांकन पद्धती, कार्यपद्धती आणि गटाने स्पर्धा कालावधीत करायचे कामकाज व मिळणारी बक्षिसे याविषयी सविस्तर माहिती दिली.

राहाता तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती कशी करावी, याचे तंत्र त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. याच वेळी शेतकऱ्यांसाठी ‘दशपर्णी अर्क’ तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले.

 

याप्रसंगी ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी गंगाधर चौधरी यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले“शेतकरी एकत्र आल्यास गटाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतात राबवणे अधिक सोपे होईल, ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढेल. आजच्या काळात सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली असून, सर्वच शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.या कार्यशाळेला श्री महादेव शेतकरी गटाचे अध्यक्ष मच्छिंद्र चौधरी, भाऊसाहेब चौधरी, अशोक चौधरी, दिलीप चौधरी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फार्मर कप स्पर्धेतील या सहभागामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!