
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या पाइपलाईनमुळे सातबारा उताऱ्यावर कंपनीने इतर हक्क नोंदवल्याच्या मुद्द्यावरून वडाळा महादेव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या विरोधात आता शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवार दि. 24 मे 2026 रोजी वडाळा महादेव येथील शेतकरी बांधवांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजितदादा काळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने नाममात्र मोबदला देत सातबारा उताऱ्यावर इतर हक्क प्रस्थापित केले असून त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणे तसेच इतर शासकीय कामांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीची परवानगी घेण्याची वेळ येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी दि. 28 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता खोकर येथील फार्म हाऊसवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बाधित गावांमधील सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन वडाळा महादेव येथील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच या प्रश्नावर तोडगा निघावा, या भूमिकेतून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजितदादा काळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बाबासाहेब पवार, सुरेश पवार, विश्वास गजाबा पवार, सुदामराव उघडे, शेतकरी संघटनेचे प्रभाकर कांबळे, सरपंच सागर मुठे, शरद आसने, संतोष मुठे आदी उपस्थित होते.




