कृषीमहाराष्ट्र

पुणतांबा, राहाता व शिर्डी मंडळातील खरीप हंगामातील पीक विमा रक्कम आठ दिवसांत जमा करा;शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील पुणतांबा, राहाता व शिर्डी मंडळातील खरीप हंगामातील पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसांत जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते, त्यानुसार शासनाने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, विमा कंपनीने मागील महिन्यात तालुक्यातील केवळ तीन मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा केली असून, पुणतांबा, राहाता व शिर्डी या मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप विमा रक्कम दिलेली नाही.

याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही विमा कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला आठ दिवसांत विमा रक्कम जमा करण्यास भाग पाडावे, अन्यथा शेतकरी संघटना व संबंधित मंडळांतील विमाधारक शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर विठ्ठलराव शेळके, सावळेराम आहेर, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब चव्हाण, सोपान वाघ, बाळासाहेब साबदे, नितीन आग्रे, अनिल रकटे, ज्ञानेश्वर सोडनार, दत्तात्रय यादव, विनायक देठे, ज्ञानदेव माऊली शेळके आदी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!