महाराष्ट्र

खा.निलेश लंके यांच्या विरोधात सोशल मीडियावरील पोस्टचा राग; तरुणावर अमानुष अत्याचार, अपहरण करून मारहाण व अपमानजनक कृत्य

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर  – सोशल मीडियावर खा. निलेश लंके यांच्याविषयी पोस्ट केल्याच्या रागातून एका तरुणावर अत्यंत अमानुष आणि संतापजनक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, मानवी हक्कांच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

फिर्यादी किशोर महादेव परभणे (वय २८, रा. बाणरवेल) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्याचे जबरदस्तीने अपहरण केले. खराडी परिसरातून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात टाकून त्याला चिंचोडी पाटील परिसरातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले.

तक्रारीनुसार, आरोपींनी त्याला बेदम मारहाण करत अंगावरील कपडे काढून अपमानित केले. त्यानंतर त्याच्याकडून जबरदस्तीने संडास साफ करून घेतला, तसेच त्याला लघवी पाजून अत्यंत अमानुष वर्तन करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक दबाव टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.

 

या प्रकरणी प्रविण विजय मोरे (रा. आठवड), शरद खंडू पवार (रा. चिंचोडी पाटील), मारुती देवराम कोकाटे (रा. सदर), रॉबीन सिंग (पूर्ण नाव अज्ञात) व अन्य एका अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 115(2), 119(1) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हे खा. निलेश लंके यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

 

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक पतंगे हे या घटनेचा सखोल तपास करत असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यामुळे एवढ्या टोकाची आणि अमानुष वागणूक देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून मानवी हक्कांवर गंभीर आघात असल्याचे मत व्यक्त होत आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!