
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – खैरीनिमगाव – पुणतांबा मार्गावर गुरुवारी सायंकाळी हॉटेल गीतगंगा जवळ भीषण अपघात घडला. या अपघातात पुणतांबा येथील गौरव अशोक बनकर (रा. बजरंग वाडी, पुणतांबा) या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौरव बनकर हा श्रीरामपूर शहरातील एका कापड दुकानात काम करत होता. काम आटोपून तो दुचाकीवरून श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे घरी जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, श्रीरामपूर – खैरीनिमगाव – पुणतांबा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या मार्गावर वाहनांचा वेग कायम जास्त असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण व रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




