प्रशासकीयमहाराष्ट्र

भंडारदरा धरणाचे ‘शताब्दी वर्ष’ पर्यटन विकासाची नांदी ठरावे – ना. विखे पाटील

पर्यटन विकासाचा सर्वसमावेशक आराखड्याचा घेतला आढावा 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अकोले –भंडारदरा धरणाचे १०० व्या वर्षात पदार्पण होत आहे. हे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, त्या माध्यमातून शाश्वत व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित झाले पाहिजे. यासाठी जुन्या ब्रिटीशकालीन वास्तूंचे जतन, वॉटर टुरिझम आणि स्थानिकांना रोजगार देणारा सर्वसमावेशक आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

 

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पर्यटन विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी निळवंडे धरण विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व सोनल शहाणे आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले , २०२६ पासून धरणाचे १०० वे वर्ष सुरू होत आहे. त्यादृष्टीने ‘डॅम रिहॅबिलिटेशन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट’ (DRIP) अंतर्गत निधी आणि राज्य शासनाचा विशेष निधी वापरून कामे केली जातील. संबंधित विभागाने वन विभाग व एमटीडीसी यांच्याशी समन्वय साधून पुढील १५ दिवसांत अंतिम ‘मास्टर प्लॅन’ सादर करावा.

 

ब्रिटीशकालीन विश्रामगृहाचे होणार ‘कॅफेटेरिया’त रूपांतर शताब्दी वर्षाचे औचित्य साधून धरणाच्या परिसरातील जुन्या ब्रिटीशकालीन विश्रामगृहाचे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर पर्यटकांच्या सोयीसाठी ‘कॅफेटेरिया’ व ‘म्युझियम’मध्ये करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. ही वास्तू केवळ अधिकाऱ्यांच्या निवासासाठी न वापरता, तिथे येणाऱ्या पर्यटकांना धरणाचा इतिहास आणि निसर्ग अनुभवता यावा, यासाठी ती खुली करावी. तसेच, पर्यटकांच्या निवासासाठी खासगी सहभागातून (PPP) आधुनिक रिसॉर्ट्स व ‘इको-फ्रेंडली’ कॉटेजेस उभारण्यावर भर देण्यात यावा.

 

‘अम्ब्रेला फॉल’ आणि ‘लेझर शो’चे आकर्षण पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला ‘अम्ब्रेला फॉल’ सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार-रविवार पर्यटकांना पाहता येईल, यादृष्टीने पाण्याचे पुनर्वापर करून व्यवस्था करावी. तसेच, धरणाच्या भिंतीवर भंडारदरा धरणाचा इतिहास उलगडणारा भव्य ‘लेझर शो’ आणि पर्यटकांना बसण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचे ॲम्फीथिएटर विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

धरण परिसरात होणारे बोटिंग अधिकृत करून तिथे ‘बोटिंग क्लब’ स्थापन करावा. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट आणि रेस्क्यू बोट सक्तीचे करावेत. तसेच, धरण परिसरात प्रदूषण टाळण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्सची सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असेही श्री.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.धरणाची उभारणी करणाऱ्या ब्रिटीश अभियंत्यांचे कार्य लक्षात घेऊन, त्यांचे उचित स्मारक किंवा पुतळा गार्डन परिसरात उभारण्यात यावा, जेणेकरून नवीन पिढीला या वास्तूच्या निर्मात्यांचा परिचय होईल, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!