प्रशासकीयमहाराष्ट्रराजकीय

‘तंटामुक्ती’ कागदापुरतीच? जळगाव ग्रामपंचायतीतील तंटामुक्ती समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील आदर्श गाव संबोधले जाणाऱ्या जळगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे वाद मिटवण्यासाठी ‘तंटामुक्ती समिती’ पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उदासीनता निर्माण झाली आहे.अनेकदा लेखी अर्ज देऊनही ग्रामपंचायत जळगाव तसेच तंटामुक्ती समितीकडून तक्रारदारांना वेळेवर दाद मिळत नसून, वारंवार लेखी तक्रारी करूनही अर्ज टेबलावर पडलेले दिसतात तरी देखील तंटामुक्ती समिती नागरिकांचे झालेले वादच मिटवायला जात नसल्याची खंत काही तक्रारदारांनी ‘अहिल्यानगर खबरबात’ शी बोलताना व्यक्त केली आहे.

 

 

जळगाव ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली नोव्हेंबर महिन्यात तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत नियमाप्रमाणे जळगाव येथील जबाबदार ‘ज्येष्ठ व श्रेष्ठ’ व्यक्तींना अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य पदावर नियुक्त करण्यात आले.मात्र सदर तंटामुक्ती समितीकडून काही मोजके विशेष वाद वगळता अन्य कोणत्याही वादांवर तोडगा न काढल्याचा ठपका बऱ्याच गावकऱ्यांनी ठेवला आहे.अनेकदा जबाबदारी घेण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे नागरिकांनी तंटामुक्ती समितीकडे जावे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सदर समिती कडून राजकारणा विरहित कामे व्हावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

बऱ्याच तक्रारदारांकडून तक्रारीचे अर्ज स्वीकारले जातात,मात्र ऐनवेळी तंटामुक्ती समितीचे जबाबदार पदाधिकारी ज्या ठिकाणी शेतीचे वाद किंवा अंतर्गत वाद आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. वादी किंवा प्रतिवादी समोर जाऊन किंवा त्या तक्रारीविषयी जाब विचारायला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे संबंधित तक्रारीचे अर्ज ग्रामपंचायतीमध्येच पडून राहतात. त्या अर्जांवर कोणताही विचार किंवा न्यायप्रक्रिया होत नसल्याने अनेक तक्रारी प्रलंबित राहतात. परिणामी काही ठिकाणी वाद भांडण, हाणामारीपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण होते.अशी गंभीर परिस्थिती असताना मात्र तंटामुक्ती समितीने थेट हात वर केल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

समितीकडुन अनेकदा तोंडी उत्तरे देत वाद मिटवायला येतो अशी शाश्वती दिली जाते, मात्र प्रत्यक्षात तंटामुक्ती समितीचे जबाबदार अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच एकही सदस्य ज्या ठिकाणी टोकाचा वाद आहे त्या ठिकाणी जाणे टाळतात. “तुम्हीच आपापसात वाद मिटवा, अन्यथा “तहसीलदार” किंवा पोलीस स्टेशनला जा,”असा सल्ला दिला जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.गावात कायदासुव्यवस्था राखली जावी म्हणुन तंटामुक्ती कार्य करते भांडण व हाणामाऱ्या होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत स्थापन केलेल्या तंटामुक्ती समितीच्या नावाने रीतसर अर्ज देऊनही तक्रारींची योग्य प्रमाणात दखल घेतली जात नसल्याने तंटामुक्ती समितीच्या कार्यपद्धतीबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “चल पुढच्या वेळी पाहू,” असेच उत्तर देत अनेकदा वाद मिटवण्यासाठी कोणीही उपस्थित राहत नसल्याचे तक्रारदारांनी ‘अहिल्यानगर खबरबात’ शी बोलताना सांगितले.

 

 

‘तंटामुक्ती फक्त नावाला कोणी येत नाही वेळेला’

जळगाव पंचक्रोशीत होणारे छोटे-मोठे वाद मिटवण्यात तंटामुक्ती समिती सपशेल अपयशी ठरत असून,पदाधिकारी तक्रारीकडे दुर्लक्ष करतात लेखी देवून पण पंचक्रोशीतील वाद मिटवायचे असल्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्याकडे जाऊन वाद मिटवण्याची अनेकदा विनवणी विनंती करावी लागते.. भाऊ…दादा..करावे लागते ‘तंटामुक्ती नावाला कोणी येत नाही वेळेला’ अशी परिस्थिती आहे.एवढे असताना त्यांच्या मनात असेल तरच ते वाद मिटवायला येतात,अन्यथा येत नाहीत, अशी माहितीही नागरिकांनी दिली आहे.सर्वसामान्य नागरिक अक्षरशः तक्रारी देऊन कंटाळले असे असतानाही अद्याप तंटामुक्ती समितीने वाद मिटवण्यासाठी ठोस पुढाकार घेतलेला नाही.असल्याचे चित्र आहे.

 

 

तंटामुक्ती समितीची गावातील वाद मिटवण्यात उदासीनता का.?

नागरिकांकडून तंटामुक्ती समितीच्या कामाच्या उदासीनतेबाबत चर्चा रंगत आहे.कुठेतरी तंटामुक्ती समिती कमी पडत असल्याचे निदर्शनास येत असून, गावातील वाद गावातच मिटावेत या उद्देशाने सर्वसामान्य नागरिक जळगाव येथील तंटामुक्ती समितीकडे लेखी अर्ज करतात.रस्ते, शेती तसेच विविध प्रकारचे वाद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिटावेत,गावातील कोणतेही वाद टोकाला जावू नये.हीच भूमिका तंटामुक्ती समितीने घेणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही गावातील तंटामुक्ती समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नावे तक्रारीचे अर्ज करूनही त्यावर कोणताही तोडगा निघत नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!