
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर –अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज गुरुवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या घटनेमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलिस विभागाला याची माहिती दिली.
खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर तात्काळ रिकामा केला. बॉम्बच्या चर्चेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्याकडेला बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त जिल्हाभरातून नागरिक येत असतात. त्यामुळे येथे रोज मोठी गर्दी होत असते. गुरुवारी सकाळीही नागरिक आपल्या कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. मात्र, बॉम्बची अफवा पसरल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी सर्वांना कार्यालयाबाहेर काढले.
यानंतर बॉम्ब शोधक पथक व डॉग स्क्वॉडकडून सखोल तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकातील ‘लुसी’ व ‘जंजीर’ या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोधमोहिमेत अग्निशमन दल व एसआयडी पथकाचेही सहकार्य लाभले.
या सखोल तपासणीत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. त्यामुळे ही बॉम्बची धमकी केवळ अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्णपणे सुरळीत सुरू करण्यात आले.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा प्रकार प्राथमिक तपासात केवळ खोडसाळपणाचा असल्याचे दिसून येत असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस सायबर सेलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




