
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
साईनाथ बनकर
खैरी निमगांव – साधारण दुपारी दोन वाजता चरणाऱ्या शेळ्यामधुन बिबट्याने एक शेळी उचलली साधारण सहा तास बिबट्या पेरुच्या बागेत शेळीजवळ बसुन होता. भक्ष खाऊन पोट भरल्यास बिबट्या हाती लागणार नव्हता हे माहीत असल्याने बचाव पथकाने चारचाकी गाड्याखाली झोपून बिबट्याला दगड मारून हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या दाद देत नव्हता अंधार पडत होता अंधार पडला मात्र बिबट्या जागा सोडायला तयार नव्हता अखेर बॅटऱ्या आणि टेंभ्याची व्यवस्था करावी लागली. ग्रामस्तही मदतीला सरसावले मात्र बिबट्याने मानसांवर चाल केली तर या धास्तीने बचाव पथकाने नागरीकांना चारचाकी गाडीत बसण्यास सांगितले पथकातील काहींनी पिंजऱ्याची व्यवस्था केली. टेभें देखील विझले रात्र होत असल्याने तसेच बिबट्या दाद देत नसल्याने अखेर फटाके वाजवून त्याला पिटाळले. पळून जाताना तो भक्ष घेऊन पळाल्याने पिंजऱ्यात भक्ष ठेवण्याचा बचाव पथकाचा डाव असफल ठरला. शेवटी कोंबड्या आणून पिंजऱ्यात ठेवल्या अन् बिबट्या जेरबंद झाला. बचाव पथकाचा हा रेस्क्यु थरार पाहून अनेकांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.

गेल्या वर्षभरापासून सातत्याने खैरी निमगांव – श्रीरामपूर रस्त्यालगच्या शेतकऱ्यांसाठी दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर काल पहाटे जेरबंद करण्यात बचाव पथकाला यश मिळाले. श्रीरामपूर – खैरी निमगांव रस्त्याच्या कडेला गेल्या वर्षभरापासुन अनेक बिबटे धुमाकुळ घालत असुन येथील प्रगतशील शेतकरी दादासाहेब एलम यांच्या वस्तीजवळील त्यांच्याच शेतात मागील पाच दिवसांपासून दत्तु माळी यांच्या दोन शेळ्या, संजय काळे यांची एक शेळी, दादासाहेब एलम यांचे दोन कुत्रे तर संजय चव्हाण यांच्या चार शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. सोमवारी नेहमी प्रमाणे संजय चव्हाण हे दादासाहेब एलम यांच्या शेतात शेळ्या चारत असताना दुपारी दोन वाजता बिबट्याने त्यांची शेळी उचलली. ही माहिती वन विभागाला तसेच बचाव पथकाला देण्यात आली. पथकातील तुषार बनकर आणि वनविभागाचे विलास डगळे हे घटना घडलेल्या शेतात हजर झाले. बिबट्या शेळीसह पेरूच्या बागेत गेल्याचे समजताच ते बागेत बिबट्याला पाहण्यास गेले असता तो शेळीजवळच बसून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पथकातील सर्वांना व्हिडीओ कॉलवर परिस्थीती दाखवली. काही वेळात सर्वजण एकत्र आले. बिबट्याने शेळी खाल्यास व पोट भरल्यास तो पिंजऱ्यात येणार नाही हे माहीत असल्याने बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी चार चाकी गाड्या खाली झोपून त्याला पिटाळण्याचा प्रयत्न केला अंधार वाढत होता. बॅटऱ्या व टेंभ्याची व्यवस्था केली. पथकातील काही कर्मचारी बिबट्यावर लक्ष ठेऊन होते. तर काहींनी पिंजऱ्याची व्यवस्था केली. वन विभागाचे अधिकारी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन करत होते. रात्री उशीरा टेंभे विझले मात्र बिबट्या उठत नसल्याचे पाहून अखेर फटाके वाजवून त्याला पिटाळले. बिबट्या जाताना भक्ष घेऊन गेल्याने ऐनवेळी कोंबड्यांची व्यवस्था करण्यात आली. पिंजऱ्यात कोंबड्या ठेऊन सर्वजण निघुन गेले. पहाटे दादासाहेब एलम तुषार संच बदल्यण्यासाठी आले असता त्यांना आण्णासाहेब कोठूळे यांच्या शेतातुन येतानाचे बिबट्याचे ताजे माग दिसले. पिंजऱ्याकडे आल्यानंतर त्यांना पिंजऱ्याचे गेट लागलेले दिसले. दादासाहेब एलम यांनी पथकातील तुषार बनकर तसेच वनरक्षक अक्षय बढे यांना माहिती दिली. वनविभाग आणि बचाव पथकाने प्रत्यक्ष येऊन बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली.
यावेळी वनविभागाचे वनरक्षक अक्षय बडे, राहुल कानडे, विलास डगळे, वनपाल विठ्ठल सानप, वर्ल्ड लाईफ रेस्क्यू टीमचे प्राध्यापक रोहित बकरे, सार्थक शिंदे, तुषार बनकर व अक्षय अभंग घटनास्थळी जाऊन पिंजऱ्यातील बिबट्याला सुरक्षितपणे हलविण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, वनविभागाच्या प्रयत्नांमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यावेळी उपस्थीत ग्रामस्तांनी टाळ्या वाजवून वनविभाग तसेच रेस्क्यु टिमचे अभिनंदन केले.

शेतकऱ्यांना दिवसाच विज द्या!
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आणि भीतीमुळे खैरी निमगाव भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी महावितरणकडे शेतीपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे, तसे निवेदन ही शेतकरी महावितरला देणार असून त्यांना रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देताना जीवाला धोका होणार नाही आणि मजूरही मिळतील ही मागणी आहे. यामुळे बिबट्यांपासून संरक्षण मिळेल आणि शेतीची कामंही सुरक्षित होतील.
दिघीचारी परिसरातही वाढता वावर
बिबटे बहुतांश वेळा मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात. मनुष्यवस्तीतील शेळ्या, मेंढ्या, कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच सतत बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या, हल्ले करण्याच्या, पाळीव प्राणी मारण्याच्या अनेक घटना दिघीचारी भागात वारंवार घडतात. खैरी निमगाव शिवारातील दिघीचारी, शेजुळ वस्ती, श्रीरामपूर रोड, उंदीरगाव शिवार, जळगाव रोड या ठिकाणी बिबट्यांचे मोठे वास्तव्य असल्याच्या घटना समोर येत आहेत; त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पहावयास मिळत असून जळगाव रोड, दिघीचारी परीसर येथे पिजऱ्यांची मागणी वाढत आहे.




