ऐतिहासिकमहाराष्ट्र

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही जनजागृती आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल- डॉ. सुजयदादा विखे पाटील

श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026’चे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहरात या यात्रेच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी, फलक, फुलांची सजावट आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जलजागृती यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथून प्रारंभ झालेली ही जलयात्रा राज्यभर प्रवास करत असून, जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ या संकल्पनेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश देत ही यात्रा पुढे सरकत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून ही यात्रा चौंडी ते महेश्वर असा महत्त्वपूर्ण प्रवास करत आहे. या यात्रेमुळे पाणी वाचवा, पाणी साठवा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करा, असा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचत आहे.

श्रीरामपूरमध्ये आगमन होताच यात्रेचे हनुमान मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि जलसंवर्धनाच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांसह आरती करून यात्रेचे स्वागत केले. यानंतर यात्रेने शहरातील विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच गुरुद्वार येथे दर्शन घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी यात्रेचा सन्मान करण्यात आला आणि जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 

या स्वागत सोहळ्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तसेच भाजप नेते संजय फंड, गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, दिपक चव्हाण, मा नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संजय छल्लारे, बंडुकुमार शिंदे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड,रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे ,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले, महिलांची आणि युवकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. दरम्यान, या जलयात्रेचा पुढील मुक्काम शिर्डी येथे असणार असून, त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या दुसऱ्या यात्रेसोबत एकत्रितपणे ही यात्रा पुढे घृष्णेश्वरकडे प्रस्थान करणार आहे. या यात्रेचा समारोप महेश्वर येथे होणार असून, त्याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

यावेळी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही जनजागृती आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेत अहिल्याबाई होळकर यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.एकूणच, ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरात जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये पाणी वाचवण्याची भावना दृढ होताना दिसून आली. ही यात्रा पुढील प्रवासातही अशाच प्रकारे जनजागृती करत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!