
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – चितळी रेल्वे स्टेशनवर दिनांक ३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी रेल्वे चौकशीच्या बहाण्याने कार्यालयात घुसून जबरी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात स्टेशन व्यवस्थापक भास्कर वाघे यांच्यासह सीताराम मीना या सहकाऱ्यालाही मारहाण करण्यात आली आहे.श्रीरामपूर येथील आरपीएफ पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असून पुढील चौकशी वेगात सुरु करण्यात आहे.
सोमवारी पहाटे २ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात इसम रेल्वे स्टेशनवरील व्यवस्थापन कार्यालयासमोर आले.आम्हाला तिकीट पाहिजे,अशी विचारणा करत त्यांनी आत येण्याचा प्रयत्न केला.स्टेशनवरील अधिकारी भास्कर वाघे व त्यांचे सहकारी सीताराम मीना यांनी रेल्वे सकाळी बारानंतर येईल,तुम्हाला ११ वाजता तिकीट मिळेल असे समजावून सांगितले.दोन्ही इसमांनी आम्ही येथील स्थानिक आहोत आम्हाला नाही म्हणता का? असे म्हणुन चिडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली आणि तिकीट खिडकीच्या दिशेने दगडफेक करत कार्यालयात प्रवेश केला.दोन्ही अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद करत हल्लेखोरांना आत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता,त्यांनी धारदार शस्त्राच्या साह्याने त्यांना इजा पोहचविली. व्यवस्थापक भास्कर वाघे यांनी घटना घडल्यानंतर तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले.या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




