
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी-गोपाल शिंदे
श्रीरामपूर – नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक (१)प्रभाग क्रमांक (१) अंतर्गत येणाऱ्या गोंधवणी रोडवर वाढते अपघात रोखण्यासाठी गतीरोधक बसविण्याची मागणी नवनिर्वाचित नगरसेविका सोनियाताई बिट्टू कक्कड आणि नगरसेवक दीपक ओमने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण दादा ससाणे यांना लेखी निवेदन सादर केले असून या निवेदनाची प्रत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की,गोंधवणी रोडवरील अतिक्रमण हटविल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र पेट्रोल पंप ते गोंधवणी महादेव मंदिर या संपूर्ण मार्गावर गतीरोधक न बसविल्यामुळे दुचाकी व जड वाहनांची भरधाव वाहतूक वाढली असून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.विशेषतः शाळा परिसर, वस्ती भाग तसेच वर्दळीच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याने पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार गोंधवणी रोडवर झिरंगे वस्ती पेट्रोल पंप, एज्युकेशन शाळेसमोर, गुरुनानक नगर संगम कलेक्शन शेजारी, गुरुनानक नगर कमानीसमोर,लक्ष्मीनारायण नगरसमोर, प्रसाद किराणा दुकानासमोर,पाणीटाकी जवळ तसेच गोंधवणी महादेव मंदिर कमानीसमोर अशा एकूण आठ ठिकाणी गतीरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली असून यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असा विश्वास नगरसेविका सोनियाताई बिट्टू कक्कड यांनी व्यक्त केला आहे.




