
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि.मध्ये कामगारांना भरघोस वेतनवाढ देण्यात व्यवस्थापनाला यश मिळाले असून,श्रमिक कामगार संघटनेने कामं बंद आंदोलनातून विजय मिळवला आहे. या वेतनवाढीत वार्षिक 38,400 रुपये, म्हणजे महिन्याला 3,200 रुपये वाढ करण्यात आली आहे.कामगारांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा निघाल्याने श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले असुन पगार वाढ केल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आणि सर्वांनी एकत्रित जल्लोष केला.

भरघोस पगार वाढ न मिळाल्यामुळे, मध्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि. कंपनीत सीटीसी आस्थापनावर कार्यरत कामगारांनी सन्मानजनक वेतनवाढीसाठी सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 पासून डिस्टीलरी गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी व्यवस्थापनाने या प्रकरणावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी कामगारांशी चर्चा केली.

कामगार संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून सीटीसी कामगारांना त्यांच्या कामाच्या प्रमाणानुसार आणि महागाईनुसार योग्य वेतन दिले जात नव्हते. राज्य शासनाने खाजगी डिस्टीलरीजसाठी त्रिपक्षीय समितीमार्फत वेतनवाढ व इतर भत्ते निश्चित करणारे परिपत्रक जारी केले होते; तरीही सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि.कडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
मागील वर्षी कामगारांच्या संयमानं कंपनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत वेतनवाढ पुढे ढकलण्यात आली होती. जुलै 2024 पासून फरकासहित नव्या दराने वेतनवाढ अंमलात आणण्याचे ठरले होते; परंतु ती अद्याप लागू न झाल्यामुळे कामगारांनी संप पुकारला.
तीन दिवस चाललेल्या चर्चेनंतर, सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि.च्या कंपनी हेड संजय धोत्रे आणि अकाऊंट इंचार्ज चंद्रभान जाधव यांनी मध्यस्ती करत जुलै 2024 ते जुलै 2025 या 14 महिन्याचा फरक प्रत्येकी 50 हजार रुपये देऊन कामगारांना भरघोस वेतनवाढ देण्याचे जाहीर केले. युनियनचे सरचिटणीस जीवन सुरुडे यांनी शांतपणे मुद्दे मांडून सकारात्मक भूमिका घेतली आणि कामगारांसाठी विजय मिळवला.
युनियन अध्यक्ष विकास वाघ म्हणाले, “अशी वाढ आम्हाला पहिल्यांदा मिळाली असून, आम्ही सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि.चे आभार मानतो. यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आणि सर्वांनी एकत्र जल्लोष केला.”कार्यक्रमात युनियनच्या उपस्थित सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. अध्यक्ष विकास वाघ, तसेच सदस्य राजेंद्र तोरणे, मुकुंद डहाळे, रामा काकडे, गणेश चौधरी, रुपेश गायकवाड, बाबा वाणी, रवींद्र वाणी, दत्तू सुसरे, शिरीष देशमुख आणि विलास चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.




