
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – जळगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक २२३ मधील गावठाण हद्दीतील सार्वजनिक चरावरील अतिक्रमणाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच जळगाव ग्रामपंचायतीत पत्रकारास झालेल्या कथित दमदाटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या निर्देशानुसार विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी विस्तार अधिकारी सुनील माळी, ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे, तक्रारदार गोरख चौधरी तसेच पत्रकार प्रवीण दरंदले यांनी संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र, गट क्रमांक २२३ मधील अतिक्रमणस्थळी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीत त्यांनी सहभाग घेतला नाही.
दिनांक १२ जून २०२६ रोजी झालेल्या या चौकशी व पाहणीदरम्यान विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी तक्रारदार तसेच गट क्रमांक २२३ मधील रहिवाशांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मूळ चराची दिशा, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. अतिक्रमणामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळित होत असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच यापूर्वी साचलेले पाणी गट क्रमांक २२३ मधील नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याच्या घटनाही घडल्याचे स्थानिकांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व बाबींची नोंद घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान गट क्रमांक २२३ व २२४ मधील चराच्या जागेची स्थिती तपासण्यात आली. ग्रामस्थांनी अतिक्रमण हटवून मूळ चर पूर्ववत खुला करून देण्याची मागणी केली. दरम्यान, जळगाव ग्रामपंचायतीने राहाता महाभूमिलेख कार्यालयाकडे संबंधित जागेच्या अधिकृत मोजणीसाठी मागणी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महसूल अभिलेखांनुसार चराची हद्द निश्चित केल्यानंतर मोजणी अहवालाच्या आधारे संबंधित स्तरावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक चराचे अस्तित्व, मूळ दिशा आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार दमदाटी प्रकरणासंदर्भातही संबंधित बाबींची चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.चौकशीदरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र, संबंधित अतिक्रमणस्थळी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीसाठी ते उपस्थित राहिले नसल्याचे दिसून आले.
पावसाळा तोंडावर असताना गट क्रमांक २२३ मधील मूळ चर हा परिसरातील पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा करणारा महत्त्वाचा प्रवाह असल्याने तो पूर्ववत मोकळा करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.चरावरील अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह बाधित होत असून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने मोजणी करून अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच मूळ चर उकरून पूर्ववत खुला करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.पावसाळ्यापूर्वी चर पूर्ववत झाल्यास परिसरातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.




