प्रशासकीयमहाराष्ट्र

खड्ड्यांतून वाहन नेताना थेट चंद्राची सफर; राहाता- चितळी रोडची बिकट अवस्था

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील चितळी -राहाता मार्गांवरील रामपूरवाडी फाटा ते ठमकेवस्ती पर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम वर्षानुवर्षे थांबलेले दिसत असून संगमनेर अंतर्गत राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असुन राहाता-चितळी रोडवरील रामपूरवाडी फाटा ते ठमकेवस्ती रोडवर असंख्य खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याचे कामं टक्केवारी घेण्याच्या नादात कुठेतरी अडकले आहे का? यात ठेकेदाराशी कोणाचे साटेलोटे असावे का? असे प्रश्न जोर धरू लागले आहेत.याकडे मंत्री, खासदार, आमदार कोणीही लक्ष देत नाहीत मात्र त्रास सर्वसामान्य जनतेलाच भोगावा लागत आहे.

 

शासन निर्णयानुसार 2023 साली राहाता–एकरुखे–चितळी–निमगाव खैरी रस्ता (प्रजिमा 11) किमी 9/00 ते 12/00 या मार्गाच्या सुधारणा कामांसाठी तब्बल दीड कोटी रुपय निधीची तरतूद करण्यात आली होती.या निधीतून रस्त्याचे माती काम, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, कच्चे गटर्स, मुरूम बाजू पट्टी आदी संकीर्ण बाबींचे काम होणार होते.मात्र जवळपास दोन वर्षे उलटून गेली तरी जबाबदारीने हे काम सुरू करण्यात आलेले नाही.या कामातून रामपूरवाडी फाटा परिसरापासून ते गणेशनगर परिसरातील ठमके वस्तीपर्यंत अंदाजे ४ किलोमीटरचा रस्त्याचे कामं झाले नाही.या महत्त्वाच्या भागाला मजबुतीकरणापासून वगळण्याचे नेमके कारण काय,हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.शासन निर्णय स्पष्ट असताना या पट्ट्याची उपेक्षा कोणाच्या दबावामुळे किंवा दुर्लक्षामुळे झाली, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांतून वाहन नेऊन आपल्या हाडांचा खिळ-खिळा करत प्रवास करावा लागत आहे.

 

 

 

कोपरगाव मतदार संघात;रस्त्यांच्या कामाचा बोजवारा

मागील अनेक वर्षापासून कोपरगाव मतदार संघात विविध भागात रस्त्यांच्या कामाविषयी बोजवारा उडत असून ग्रामीण भागातील अनेक रस्ते हे खड्ड्यांच्या साम्राज्यात गेलेले आहेत त्याचा भाग म्हणजे रामपूरवाडी फाटा ते ठमके वस्तीपर्यंत असलेला हा रस्ता आणि यावरील असलेल्या असंख्य खड्ड्यांना चुकवत नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो.मागील अनेक वर्षांपासून मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.मात्र या ठिकाणी कोणताही ठेकेदार काम करण्यास धजावत नाही.नेमके रस्त्याच्या कामाबाबत अडथळा कुठे येतो,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. याकडे विद्यमान खासदार–आमदार लक्ष देत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

 

 

 

खड्ड्यांतून वाहन,थेट चंद्राची सफर

खराब रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. हल्ली या खड्ड्यांतून वाहन नेताना नागरिकांना अक्षरशःचंद्राची सफर घडते.रस्ता ठीक नाही मात्र विविध प्रकारचे दिशादर्शक बोर्ड रस्त्याला लावलेले दिसतात.एखाद्या इंटरनॅशनल हायवेलाही लाजवेल अशा बोर्डची संख्या या रस्त्याला आहे परंतु रस्त्यात खड्डेच असल्याने ही सफर घडविण्यात खासदार–आमदार यांचा मोलाचा वाटा आहे, अशी टीका नागरिक करत आहेत. या रस्त्याने आमदार, खासदार, मंत्री यांनी एकदा प्रवास करून बघावा,अशी विनंती प्रवाशांनी केली आहे.

 

 

 

ठेकेदाराकडून चांगल्या:कामाला केराची टोपली

महाराष्ट्र शासन व संगमनेर अंतर्गत राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन २०२३ साली शासन निर्णय क्रमांक पीएलएन-2023/ सीआर 10193/नि-3 नुसार रस्त्यांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला,परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम समाधानकारक झालेले नाही.२०२४ मध्ये ठमकेवस्ती ते आळंदी ओढ्यादरम्यान रस्त्यावरील खड्ड्याची डागडुजी केली तिथून पुढे रामपूरवाडी फाट्या पर्यंत काम योग्य पद्धतीने झालेच नाही.कामं निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता आणखीनच खराब झाला आहे.डागडुजी केलेले खड्डे पुन्हा मूळ स्वरूपात आले आहेत.खड्ड्यांमध्ये टाकलेले खडी, डांबर व कचकडी पावसामुळे निघून बाजूला गेल्याने वाहन स्लिप होतात अपघात घडत असुन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!