
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील रामपूरवाडी-एकरूखे शिवारात रात्रीच्यावेळी मुक्त संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांनी मोठी भीती व्यक्त केली आहे.कोपरगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता थोरात यांनी घटनास्थळी येऊन गणेश आभाळे यांच्या वस्तीच्या परिसरात एक पिंजरा लावला असुन बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू करण्यात केली आहे.बिबट्यांचा शोध घेऊन तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांचे सर्रास दर्शन होत असल्याने भीतीने नागरिक हवालदिल झाले असुन दिवसेंदिवस बिबट मानवी वस्तीच्या अगदी जवळ येत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.बुधवारी (दि.१०) सप्टेंबर रोजी रामपूरवाडी भागातील सत्रावाडी परिसरात सतीश जगताप यांच्या वस्तीवर 2 शेळ्या बिबट्याने फस्त केल्या तर भुसाळ वस्ती,दळवी वस्ती,भुसाळ वस्ती, सत्रावाडी,जोंधळे वस्ती, रामपूरवाडी-पुणतांबा रोड परिसरामध्ये तब्बल तीन बिबट्यांचे वास्तव्य असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.भक्षाच्या शोधात दिवसा किंवा रात्री बिबटे लोकवस्तीत दिसतात. पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.शेतवस्तीवर असलेल्या हिरवळीचा सहारा घेऊन विलुप्त होतात.

नागरिकांनी सतर्क राहावे; कोपरगाव वनविभाग
राहाता तालुक्यातील कोणत्याही परिसरात कोठेही बिबटे दिसल्यावर नागरिकांनी सतर्क राहावे .जेष्ठ वृद्ध व बालकांना रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडु देवू नये .शक्यतो शेतात जाताना समूहात जावे.टॉर्चचा वापर करावा.शेतवस्त्यांवर ऊस, गिन्नी गवत, द्राक्ष डाळिंब पेरू बागेत बिबट्यांचे वास्तव्य असते पोल्ट्री फार्म गोट फार्म लोकवस्ती अशा ठिकाणी बिबटे शिकारीच्या शोधात दिसून येतात.तसेच शेतात वाकून काम करणे टाळावे जेणेकरून बिबट्या हल्ला करणार नाही.लोकवस्तीत बिबट्या दिसल्यास फटाके फोडावे .सावधानता व सतर्कता बाळगावी .बिबट्या आढळून आल्यास तात्काळ कोपरगाव वनविभागाला माहिती द्यावी.
– निलेश रोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोपरगाव
रामपूरवाडी- एकरूखे परिसरातील विविध वस्त्यांवर दररोज बिबटे दर्शन देत आहेत यामुळे मोठे भयाचे वातावरण निर्माण झालेले आहे.सदर रस्त्यावरून शालेय विद्यार्थी शेतकरी प्रवासी नागरिक कामानिमित्त ये-जा करत असतात त्यांच्यावर बिबट्याकडून हल्ला होण्याचा संभाव्य धोका निर्माण होतो. वनविभागाने याकडे लक्ष देऊन थर्मल ड्रोन चा वापर करून बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे नागरिकांना भयमुक्त करावे.
– संदीप सुरडकर, सरपंच रामपूरवाडी




