
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
शिर्डी – शिर्डी – संभाजीनगर ते अहिल्यानेगर मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अत्यंत दयनीय अवस्थेत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
खासदार वाकचौरे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, या महामार्गावरील डांबरीकरण मोडकळीस आले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे व उंचसखल पॅच तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक ठरत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा गंभीर अपघात टळले असले तरी किरकोळ अपघात वारंवार घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याशिवाय रस्त्यावरील सुविधा अपुऱ्या असून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी सांगितले. अनावश्यक ठिकाणी बसवलेले डिव्हायडर आणि बेकायदेशीर कट यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. पावसाळ्यानंतर रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या जवळपास पूर्णपणे अदृश्य झाल्याने विशेषतः रात्री वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे.महामार्गाच्या देखभालीचा करार ३ सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात आला असून, मागील कंत्राटदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे वाकचौरे यांनी स्पष्ट केले. सध्या हा रस्ता अक्षरशः उध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून खासदार वाकचौरे यांनी महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अनावश्यक डिव्हायडर हटवावेत, रस्त्यावरील पट्ट्या पुन्हा रंगवाव्यात तसेच नवा देखभाल करार जबाबदार व सक्षम कंत्राटदाराला देऊन दर्जेदार काम करावे, अशी मागणी केली.ही समस्या केवळ सोयीची नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याने तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी खासदार वाकचौरे यांनी गडकरींना केली.
याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे खासदार वाकचौरे यांनी पत्रकारांना सांगितले.




