(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय” म्हणून तिस-यांदा गौरविलेले एकमेव महाविद्यालय असलेल्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये नुकत्याच मॅकलॉईड फार्मास्युिटीकल्स प्रा.लि. मुंबई या कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये ५५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळाली ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राम पवार यांनी सांगितले.
शिक्षण हे ग्रामीण परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे या विचार धारेवर गरीब, गरजू व होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीनींना कालसुसंगत व दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे जीवनमान समृध्द व उन्नत व्हावे या उद्देशाने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत १९७१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या महाविद्यालयामध्ये आज तीन हजाल विद्यार्थी विविध विषयांमध्ये ज्ञानार्जन करीत आहेत.
या महाविद्यालयामध्ये नेहमीच अशा प्रकारच्या परिसर मुलाखती आयोजित केल्या जातात, तसेच या परिसर मुलाखतीकरिता समोरे जाण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन लाभते व त्यातून अनेक विद्यार्थ्यांची निवड होते. एम.एस्सी. केमिस्ट्री उत्तीर्ण व सध्या शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयामधील व प्रवरा परिसरातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला.मुलाखती यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल समितीचे चेअरमन डॉ. हरिभाऊ डुबे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. अनिल वाबळे, प्रा. छाया गलांडे, डॉ. आर. बी. गायकर, श्री. एकनाथ सरोदे आणि श्री. आप्पासाहेब शेळके यांनी अथक परिश्रम घेतले.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील विखे विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस.एन. हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिक संचालक डॉ. प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पोलिस भरती व आर्मी भरती पूर्व तयारी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन केले जाते. याचेच फलित आज दिसून येत आहे. महाविद्यालयामध्ये परिसरातील बेरोजगार व शाळाबाह्य युवकांबरोबरच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना रोजगारक्षम व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ज्ञान संपादन करता येते, अशी माहिती डॉ. राम पवार यांनी दिली.




