प्रशासकीयमहाराष्ट्र

चितळी रेल्वे स्थानकावर गाड्यांना अधिकृत थांबा द्यावा:सरपंच नारायणराव कदम यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – चितळी स्टेशन हे नगर–दौंड रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून बहुतांश गाड्या येथे थांबत नसल्याने शेकडो प्रवाशांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या या सततच्या गैरसोयी लक्षात घेऊन चितळी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांनी रेल्वे प्रशासनाकडे चितळी स्थानकावर गाड्यांना अधिकृत थांबा मंजूर करण्याची ठाम मागणी केली आहे.

 

 

 

सरपंच कदम यांनी चितळी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर राकेशकुमार मीना यांच्याकडे दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अमरावती–पुणे एक्सप्रेस (११०२६), पुणे–अमरावती एक्सप्रेस (११०२५), निजामाबाद–पुणे एक्सप्रेस (११४१०) आणि दौंड–निजामाबाद एक्सप्रेस (११४०९) या चारही गाड्यांचा थांबा चितळी स्थानकावर देण्यात यावा. कारण या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, चितळी स्टेशन हा त्यांच्यासाठी केंद्रबिंदू ठरत आहे.मात्र रेल्वे गाड्या थांबत नसल्याने प्रवासी नागरिकांचे प्रचंड हाल होतात.

 

कदम यांनी सांगितले की, सध्या गाड्यांचा थांबा नसल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, शासकीय कर्मचारी आणि नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक या गैरसोयींना दररोज सामोरे जात आहेत. चितळी व परिसरातील प्रवाशांना प्रवासासाठी बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव किंवा अहिल्यानगर याठिकाणी असणाऱ्या स्थानकावर जावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा वाया जातो तसेच अनावश्यक त्रास सहन करावा लागतो.तसेच शिर्डी व साकुरीसारखी आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटनस्थळे चितळी जवळ असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्थानकावर गाड्यांचा थांबा नसल्यामुळे पर्यटकांनाही पर्यायी मार्ग शोधावा लागतो.

 

चितळी रेल्वे स्थानकावर गाड्यांचा थांबा मिळाल्यास स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, प्रवास खर्च वाचेल आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल,स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल असे सरपंच नारायणराव कदम यांनी ठामपणे सांगितले असून प्रशासनाने निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून येथे रेल्वेला थांबा द्यावा असे त्यांनी म्हंटले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!