
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – आपल्या अंगभूत क्षमतांचा विकास आणि आवडीच्या क्षेत्रामध्ये काम केल्याचा आनंद घेवून स्वता:ला सिध्द करता येणारे क्षेत्र निवडून भविष्य घडविण्याचा संदेश अखिल भारतीय मराठी साहीत्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ मिंलीद जोशी यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधतांना दिला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात मिलिंद जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, सौ. मनीषा जोशी, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे विखे पाटील,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, कॅम्पस संचालक डॉ. आर. ए. पवार आदींसह प्रवरा परिवारातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी गुणवंत विद्यार्थी पालक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जोशी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कुठल्या कष्टातून जावे लागते हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी जवळून पाहिलेलं होते.पुढच्या पिढ्यांच्या वाट्यातील अडथळे दूर व्हावेत यासाठी शैक्षणिक क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही. या शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या जडणघडणीमध्ये मध्ये कर्तृत्व संपन्न विद्यार्थी घडवून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संस्थेचे विद्यार्थी यशस्वीपणे कार्यरत राहावेत म्हणून केलेल्या प्रयत्नांचे डॉ. जोशी यांनी कौतुक केले.
आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान माझ्या हस्ते होतोय याचा मला अतिशय आनंद होत आहे. आजची तरुण पिढी ही अतिशय हुशार आहे ती मोबाईल सहजतेने वापरते इंटरनेट सहजतेने वापरते आज सगळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे त्या सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी सहजतेने मैत्री करण्याचे सामर्थ्य तरुणपिढी मध्ये आहे. आपल्याला काय वाटते कुठल्या क्षेत्रामध्ये जायचे आहे हे पालकांना आणि शिक्षकांना सांगितले पाहिजे.अनेक क्षेत्र तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे त्या सर्व क्षेत्रांचा तुम्ही अभ्यास केला पाहीजे असे सूचित करून औषधांवरती जशा एक्सपायरी डेट असते तशा इथून पुढच्या काळामध्ये त्या पदव्या वरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण जे क्षेत्र निवडणार आहोत त्यांची परिपुर्ण माहीती घ्पा, नोकरीच्या फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रातले लोक असे म्हणतात की, संधी खूप उपलब्ध आहे पण आम्हाला योग्य गुणवत्तेची माणसं मिळत नाही. उपलब्ध मनुष्यबळाचं उपयुक्त मनुष्यबळामध्ये रूपांतर करणं हे शिक्षणक्षेत्रा समोरच सगळ्यात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
येणा-या काळामध्ये केवळ पदवी आहे म्हणून तुमचे या स्पर्धेच्या स्थान टिकेल असे नाही तुम्हाला उत्तम बोलता, लिहिता आणि उत्तम संवाद साधून सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाता आले पाहिजे. ही कौशल्य आहे ती तुम्हाला आत्मसात करावी लागतील आणि हेच काम प्रवरेत होत आहे.उत्कृष्ट संवाद कौशल्यातून स्पर्धेला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी पद्मश्री विखे पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत असताना पद्मश्रींचे कार्य हे सूर्यासारखे आहे.ते विद्यार्थ्यांनी जतन करून त्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीतून ग्रामीण भागामध्ये परिवर्तनाची एक वेगळी दिशा देण्याचे काम पद्मश्री नी केले आहे आज सहकारी चळवळीमुळे शेतकरी सामान्य जनतेची पिळवणूक थांबली आहे. शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिक्षण देत असताना शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थी पुढे गेल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना सहकारामुळे मिळाल्याचे म्हस्के पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविकांमध्ये डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत असतानाच प्रवरेच्या माध्यमातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र , प्रवरा स्पर्धा परीक्षा, पोलीसआर्मी भरती, प्रवरा स्पोर्टस अॅकेडमी त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध शालेय उपक्रमातून सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यावर प्रवरेचा भर असल्याचेय त्यांनी सांगितले. यावेळी दहावी आणि बारावी, विविध क्रीडा क्षेत्रात आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील दिव्यांग बांधवांसाठी संस्थेने सुरू केलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी आणि डॉ. वैशाली मुरादे यांनी तर आभार डॉ. आर.ए. पवार यांनी मानले.




