
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापनेचा कायद्यानुसार ठराव मंजूर करावा तो ठराव केवळ कागदावर मर्यादित राहू नयेत यासाठी प्रयत्न करावे बालविवाहमुक्त अहिल्यानगर जिल्ह्याचे स्वप्न साकारण्यासाठी “ग्रामस्तरावर बालहक्कांची अंमलबजावणी होणं गरजेचे असून त्यासाठी गावपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन होवून सक्रीय झाल्या पाहिजे अश्या सूचना राहाता तालुक्याचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि सर्व पंचायत समित्यांच्या संयुक्त विद्यमाने “संकल्प बालविवाह मुक्तीचा, अहिल्यानगर जिल्ह्याचा!” या घोषवाक्याखाली “अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे अभियान उडान” अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी प्रास्ताविक करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम 1986, हुंडा प्रतिबंधक कायदा, बाल संरक्षण कायदा 2015, किशोर न्याय कायदा 2015 आणि पोस्को कायदा 2012 यांची सविस्तर माहिती दिली.
गटविकास अधिकारी विवेक गुंड म्हणाले, बालकांच्या न्याय हक्कासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम गावोगावी प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ग्रामस्तरावरून सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी या अभियानाला पाठबळ दयावे पंचायत समिती प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. पंचायत समिती राहाता आणि उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही गावपातळीवर जनजागृती आणि प्रशिक्षण देत आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेत बालविवाह, बाल भिक्षावृत्ती,बाल कामगार, हुंडा प्रथा यासारख्या सामाजिक समस्या रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. यावेळी तालुका आणि ग्रामस्तरावर बाल संरक्षण समित्या प्रभावीपणे स्थापन करून कार्यरत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, मानद संचालक ऍड.बागेश्री जरंडीकर,संचालक हनीफ शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम यांचे या कार्यशाळेस सहकार्य लाभले.यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ, तालुका बाल संरक्षण अधिकारी विकास बागुल, चाईल्डलाइन समन्वयक महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडेकर,विनायक महाले,उडान तालुका प्रतिनिधी प्रवीण दरंदले यांनी सूत्रसंचालन केले शुभम डहारे यांनी आभार मानले.




