पर्यावरणप्रशासकीयमहाराष्ट्र

जळगाव ग्रामपंचायतीकडून विनापरवानगी वृक्षतोड केल्याचा दावा; ग्रामस्थांच्या निवेदनानंतर कोपरगाव वन विभागाकडून पंचनामा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील ग्रामपंचायत जळगावच्या हद्दीत, चितळी-जळगाव रोडलगत लोकसहभागातून लावण्यात आलेल्या काही वृक्षांची पाईपलाईन कामादरम्यान जेसीबीच्या सहाय्याने विनापरवानगी तोड करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने दि.3 फेब्रुवारी रोजी जळगाव ग्रामपंचायती सह कोपरगाव वन विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले होते.

 

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब प्रल्हाद चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 5 फेब्रुवारी रोजी प्राथमिक पाहणी करण्यात आली. त्यानुसार वनरक्षक सविता थोरात यांनी 11 फेब्रुवारी रोजी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याच्या वेळी जळगावचे सरपंच शिवाजी साबदे, उपसरपंच दिलीपराव चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे तसेच तक्रारदार बाळासाहेब चौधरी, विजय चौधरी, रविराज चौधरी आदी उपस्थित होते. पंचनाम्यात काशीद प्रजातीची दोन झाडे आणि करंज प्रजातीचे एक झाड पाईपलाईन टाकताना जेसीबीद्वारे मुळासकट उखडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांच्याकडे पंचनामा तक्रारी अर्ज सादर करण्यात आला असून या संदर्भात वनविभागाकडून चौकशी प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या नियमांनुसार जी काही कारवाई होईल, त्याबाबतची माहिती तक्रारदार व जळगाव ग्रामपंचायतला कळवली जाईल, अशी माहिती वनरक्षक सविता थोरात यांनी दिली.

 

दरम्यान, सरपंच शिवाजी साबदे यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करत लेखी जबाबात नमूद केले की, जळगाव ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांच्या सोयीसाठी पाईपलाईनचे काम सुरू होते.कामादरम्यान संबंधित झाडांचा अडथळा निर्माण झाला होता. मात्र ती झाडे जाणूनबुजून तोडलेली नसून अनवधानाने तुटली गेली. झाडांच्या झालेल्या नुकसानीपेक्षा दुप्पट वृक्ष लागवड करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

 

या प्रकरणात अवैध वृक्षतोडीबाबत पुढील कारवाईसाठी कोपरगाव वन विभागाकडे पाठपुरावा सुरू असून चितळी-जळगाव रोडलगत झालेली वृक्षतोड अवैध असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तक्रारीची वनविभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब चौधरी, लहानू चौधरी,प्रकाश गुंड,अण्णासाहेब चौधरी, महेंद्र चौधरी, विजय चौधरी, रविराज चौधरी, डॉ. गोरक्षनाथ चौधरी, रवींद्र चौधरी, बापूसाहेब चौधरी,राजेंद्र आदमाने,अशोक शिंदे,बाळासाहेब निर्मळ,दत्तात्रय पंडित, भागवत वाघ,अभिजित वाघ, ज्ञानेश्वर ओळेकर,आदींसह ग्रामस्थांनी सह्यांसह दिलेल्या तक्रार अर्जातून केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!