
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहुरी – भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि राजकीय उदासीनतेमुळे आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे. “दर पाच वर्षांनी राजकीय खांदे बदलतात, मात्र शेतकऱ्यांप्रती धोरणात्मक विचार मात्र बदलत नाहीत,” असे स्पष्ट व ठाम मत गुरुवर्य ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी देवळाली प्रवरा येथील कीर्तन सेवेत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, “आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतो आहे. दोन-पाच हजारांची नोकरी त्याला परवडते, पण शेती नकोशी वाटते. यामागचं मुख्य कारण म्हणजे कष्टाचा मोबदला मिळत नाही. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, त्यामुळे शेती आणि शेतकरी वाचले पाहिजेत.”सरकारच्या योजनांवर टीका करताना ते म्हणाले, “सरकार जे शेतीसाठी योजना आणते, त्या फक्त खुळखुळ्यांसारख्या आहेत – आवाज होतो पण परिणाम नाही. विरोधकही काही काळासाठी शेतकऱ्यांचा विषय घेतात, पण लवकरच विसरतात.”
शेतकऱ्यांच्या तोंडी तोच एक शब्द – “तोट्यात शेती”
कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात भ्रमंती करताना अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला मिळतात. “शेती फक्त करायची म्हणून करतोय महाराज, पण नफा नाही, उलट तोटा होतो,” हेच शब्द अनेक शेतकरी उच्चारतात, असे महाराजांनी सांगितले. “आज लोक ‘माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर आहे’ असे अभिमानाने सांगतात, पण ‘माझा मुलगा उत्कृष्ट शेती करतो’ असे अभिमानाने कोणी सांगत नाही, ही फार मोठी खंत आहे.”
महाराज पुढे म्हणाले, “आम्ही जरी वारकरी संप्रदायाचे सेवक असलो तरी या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतीबाबत आम्हाला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेती ही आपली आई आहे आणि तिचा सन्मान केला गेला पाहिजे.”
- शेतकरी संघटनांचा ह.भ.प मंडलिक महाराजांना पाठिंबा आणि अभिनंदन
महाराजांच्या प्रबोधनात्मक आणि वास्तवदर्शी कीर्तनाने उपस्थित शेतकरी भाविकांच्या हृदयाला हात घातला. त्यांच्या विचारांचे सर्वत्र स्वागत होत असून, अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बंधू-भगिनींनी गुरुवर्य उद्धवजी महाराज यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संघटनेच्यावतीने म्हटले गेले आहे की, “महाराजांनी ज्या प्रकारे निर्भीडपणे शासनाच्या असंवेदनशील धोरणांवर बोट ठेवलं आहे, त्यामुळे शासनही जागं होईल आणि शेतकरी वर्गालाही नवी उमेद मिळेल.




