Uncategorized

खैरी निमगाव येथील वाघाईमाता मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली;श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

खैरी निमगांव – श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील ग्रामदैवत वाघाईमाता मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील दहा हजार रुपये रक्कम तसेच चार हजार रुपये किमतीचे सिसीटीव्ही आणि डिव्हीआर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. यापूर्वीही याच मंदिरात दोनवेळा दानपेटी फोडून त्यातील रक्कम नेण्याची घटना घडली आहे. वाघाई देवी मंदिराचा साईड दरवाजाचा कोयंडा वाकवून तोडून चोरट्यांनी आत मंदीरात प्रवेश केला.

त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील साधारण दहा हजार रुपये रक्कम काढली. त्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आतमधील एलसिडी स्क्रीन, सिसीटिव्ही तसेच मागच्या रूममधील डिव्हीआर असा चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला.

सोमवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. गावातील एका तरुणाने देवीच्या मंदिरात अनुचित प्रकार घडत असल्याचा अंदाज आल्याने तेथे जाऊन आवाज दिला असता तिन अज्ञात चोरटे मंदीरात उचकापाचक करीत असल्याचे दिसुन आले. आवाज ऐकताच ते देवीच्या मागे असणाऱ्या तलावाच्या कडेने पळून जात येथील स्मशानभुमीत लावलेल्या टिव्हीएस स्टार कंपनीच्या गोल बल्प असलेल्या विना नबंरच्या जुन्या गाडीने पळून जाण्यात यशस्वी झाले.

तरुणांनी पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. मंदिरात यापुर्वी देखील अज्ञान चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली होती. दरम्यान एलसीडी स्क्रीन फुटलेल्या अवस्थेत तलावाच्या कडेला मिळून आली. दानपेटी फोडण्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी मोठी गर्दी केली. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि सहकाऱ्यांनी पहाटच्या वेळी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पुन्हा दहा वाजता पोलीसांसोबत नगर येथील श्वानपथकास पाचारण करण्यात आले. पथकातील कुत्र्याने चितळी रोडच्या दिशेने मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर माग काढला.

त्यानंतर ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. वाघाई देवी गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान तालुका पोलिसांनी तातडीने चोरांचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी आप्पासाहेब शेजुळ यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुरन ३६१ / २०२५ नुसार नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर ढोकणे, गोपनिय विभागाचे अनिल शेगांळे हे करत आहेत.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!