
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील वाकडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे चितळी येथे होणारे स्थलांतर अखेर थांबविण्यात आले असून, या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयामागे गावकऱ्यांची एकजूट, राजकीय नेत्यांचा सक्रिय सहभाग, शेतकरी संघटनांचा पाठिंबा आणि पत्रकारांनी दिलेला आवाज हे सारे महत्त्वाचे घटक ठरले. बँक शाखा चितळी येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव समजताच ग्रामस्थांनी त्वरित हालचाली सुरू केल्या. बँकेचे चेअरमन, पुणे व दिल्ली येथील अर्थ मंत्रालय, तसेच नगर येथील झोनल अधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली.
परंतु बँकेचे वरिष्ठ अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी गाव बंदचा इशारा दिला. एक दिवस वाकडी गाव बंद ठेवण्यात आले. त्यानंतर बँकेसमोर डेप्युटी मॅनेजर सौ. वर्षा कुल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोणताही स्पष्ट निर्णय झाला नसला, तरी गावकऱ्यांनी ‘बँक स्थलांतर होऊ द्यायचे नाही’ अशी ठाम भूमिका मांडली.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शाखा व्यवस्थापक रोहन आहिरे यांच्यासह चर्चा करून अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला व दिल्लीला निवेदन मेलद्वारे पाठवले. त्यानंतर राजकीय स्तरावरूनही पाठपुरावा सुरू झाला आणि शेवटी बँक स्थलांतराचा प्रस्ताव मागे घेण्यात आला.
बँक शाखा कायम वाकडी येथेच राहणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, युवक मंडळ, सर्व पक्षांचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त करत बँक व्यवस्थापनासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार अशुतोष काळे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि पत्रकार बंधू यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.या लढ्यात वाकडी खंडोबाचीतील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सर्व पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, शेतकरी, महिला बचत गट, तरुण मंडळ, वृद्ध व्यक्ती, व्यापारी वर्ग आणि पत्रकारांनी मतभेद बाजूला ठेवत एकत्रितपणे आवाज उठवला.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी या एकतेचे कौतुक करताना सांगितले की, “आज गावकऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष केल्यामुळेच हा विजय मिळवता आला. यापुढेही गावाच्या आर्थिक व विकास कामांसाठी अशीच एकजूट आवश्यक आहे.”




