
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मोठी कारवाई केली. गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तब्बल ७५,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
(दि.२५) जून २०२५ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गोधेगाव शिवारात नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे. त्यांनी त्वरित नेवासा पोलीस स्टेशनच्या पथकासह छापामारी केली असता काही आरोपी घटनास्थळी मिळून आले तर काहीजण वाहन सोडून फरार झाले.
या कारवाईत प्रविण म्हस्के, विशाल ठोंबरे (जेसीबी चालक), अभिषेक जाधव हे ताब्यात आले असून त्यांनी पळून गेलेल्या अन्य आरोपींची नावे उघड केली. या आरोपींकडून एक जेसीबी, सहा ट्रॅक्टर ट्रॉली, आणि अंदाजे पाच ब्रास वाळू जप्त करण्यात आली. संबंधित वाहनांची अंदाजे किंमत पुढीलप्रमाणे आहे – जेसीबी (३० लाख), विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली (प्रत्येकी ७ ते ९ लाख दरम्यान) आणि वाळू (३० हजार रुपये).
या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६२३/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३०५ (ई), ३(५) व पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलुबमें, डॉ. सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली.
या विशेष पथकात पोसई राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, पोकॉ सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचा समावेश होता. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई नेवासा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
