पर्यावरणप्रशासकीयमहाराष्ट्र

लालवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवर सतत हल्ले, ग्रामस्थ भयभीत

उसाच्या पट्ट्यात बिबट्यांचा वावर वाढला; वनविभागाकडून तातडीने कारवाईची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील जळगाव परिसरातील लालवाडी भागात बिबट्याकडून दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. यामुळे शेतवस्तीवरील नागरिकांत घाबराट पसरली आहे. या घटनांचा शेतकरी वर्गाने सर्वाधिक धसका घेतला आहे. लालवाडी परिसरातील रमेश चौधरी यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीवर हल्ला केला.शेळीच्या नरडीचा घोट घेण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यास मोठा आवाज करून हुसकावून लावल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.कोपरगाव वनविभागाने परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी समस्त नागरिकांकडून केली जात आहे.

लालवाडी परिसरातील रमेश चौधरी व कुलदीप चौधरी यांच्या घराजवळ गुरुवारी (दि. ११) साडेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे दर्शन भरवस्तीवर झाले. यावेळी शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याने गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळीवर हल्ला चढवला. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने रमेश चौधरी व कुलदीप चौधरी हे सतर्क झाले. घरातून बाहेर येताच समोर बांधलेल्या शेळीला बिबट्याने जबड्यात धरले आहे, असे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काठी व बॅटरीच्या साह्याने बिबट्याला हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या काही वेळ त्यांच्या घरासमोर स्तब्ध उभा होता.

 

या घटनेची माहिती वनरक्षक सविता थोरात यांना देण्यात आली. जळगाव परिसरातील बिबट्यांची संख्या पाहता पिंजऱ्याची व्यवस्था करून देण्यात येईल, तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनरक्षक थोरात यांनी केले. चितळीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी बाचकर यांनी शेळीची तपासणी केली.शेळीच्या मानेवर गंभीर जखम झालेली असून तिचे प्राण वाचले आहेत. जळगाव परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने शेतवस्त्यांतील कुटुंबांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.यावेळी शेतकरी रमेश चौधरी, कुलदीप चौधरी, सचिन चौधरी, जितेंद्र चौधरी, विनायक आदमने, विकास चौधरी आदींसह परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

 

जळगाव येथील लालवाडी भागात उसाचे क्षेत्र आणि हिरवळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बिबटे मानवी वस्तीच्या परिसरात येतात व पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्री लाईट असल्याने पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते, तर शेतवस्तीत घर असल्यामुळे लहान मुलांना बिबट्याचा सर्वाधिक धोका आहे. कोपरगाव वनविभागाने तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा.- कुलदीप चौधरी,शेतकरी 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!