
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – राहुल राजळे
नेवासा – जेष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त सोनई (ता. नेवासा) येथे सोमवारी दिनांक १२ मे २०२५ रोजी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संस्था प्रमुख, साहित्यिक, कार्यकर्ते, शेतकरी, संत-महंत, विधिज्ञ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत अभिष्टचिंतनासाठी गावात उत्साही गर्दी पाहायला मिळाली. उपस्थित सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार मा. खा. यशवंतराव गडाख यांनी केला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “सामाजिक जीवनात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून काम करण्याचा मला नेहमीच ध्यास राहिला. रचनात्मक आणि विधायक काम करताना जनतेच्या सेवेसाठी मनापासून झटता आले, याचा मला अभिमान वाटतो. माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आजच्या या वाढदिवशी इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले, याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला ह. भ. प. देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत अवेराज महाराज, ह. भ. प. रामनाथ महाराज पवार, लक्ष्मणनारायण महाराज जोंधळे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, गणेश महाराज शेजुळ, नामदेव महाराज कोरडे, अतुल महाराज आदमने, ब्रह्मकुमारी उषा दीदी, तसेच गडाख कुटुंबीय व अनेक जुने जाणते कार्यकर्ते उपस्थित होते.विशेष म्हणजे, याप्रसंगी मा. खा. यशवंतराव गडाख यांना भेट म्हणून आलेली पुस्तके नेवासा तालुक्यातील विविध ‘यशवंत वाचनालयां’ना भेट म्हणून देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
